थोरस्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन संपादकीय महेंद्रसिंह राजपूत

 


थोरस्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

संपादकीय महेंद्रसिंह राजपूत

थोरस्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर  यांच्या कार्यकाळातील सुवर्णकाळ  म्हणजे शिरपूर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तनाचे धगधगते पर्व.

शिरपूर तालुक्याचा इतिहास पाहिला तर सामाजिक चळवळीपासून ते शैक्षणिक क्रांतीपर्यंत काही ठळक व्यक्तिमत्त्वांनी तालुक्याला नवी दिशा दिली. यामध्ये अग्रस्थानी नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी, माजी आमदार मा. अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांचं.

स्वातंत्र्य लढ्यातले योगदान  आणि धगधगतं राष्ट्रप्रेम त्यांच्या अंग अंगात भिनले होते.ब्रिटिश सत्तेच्या काळात केवळ शासनविरोध म्हणून नव्हे, तर शोषित समाजाच्या सन्मानासाठी अण्णांनी लढा उभारला. जेलवास पत्करून, अत्याचार सहन करून देखील त्यांनी राष्ट्रवादाचा दीप विझू दिला नाही. स्वातंत्र्याची पहाट ही त्यांच्या आत्मबलिदानातून आली, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून त्यांच्या इतिहासात उल्लेख थोर स्वातंत्र्य सैनिक म्हणून देखील होतो.

अण्णांना माहित होते की शिक्षण हेच खरे समतेचे शस्त्र आहे. आणि म्हणून शिरपूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणणारे अग्रदूत म्हणजे अण्णासाहेब. त्यांनी 'शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम आहे' यावर ठाम विश्वास ठेवत, १९५०-६० च्या दशकात डोंगर-पाड्यात, गावागावात शिक्षणसंस्था स्थापन केल्या. त्यांचा उद्देश होता – गरीब, आदिवासी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोचवणं.

 किसान विद्या प्रसारक संस्था आणि त्यांच्यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून  माध्यमातून शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचं योगदान अतुलनीय राहिलं आहे. या संस्था आजही हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवत आहेत. आजही शिक्षण क्षेत्रात गोरगरिबांच्या मुलांना प्रमुख स्थान देणारी संस्था म्हणून त्यांची ओळख आहे.

अण्णांची भूमिका नेहमीच समाजकारण आणि राजकारणातील संयमी योद्धा म्हणून राहिली आहे.

शिरपूरच्या राजकारणात त्यांनी संयमी, शिस्तबद्ध, विचारप्रधान राजकारणाचा आदर्श घालून दिला. आमदारकीच्या काळात त्यांनी केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या विकासासाठी निर्णय घेतले. रस्ते, पाणी योजना, वीज, आरोग्य, सहकारी बँका या क्षेत्रात मूलगामी निर्णय घेऊन तालुक्याला प्रगतीच्या दिशेने नेले. त्यांनी केलेली विकासाची पायाभरणी आज देखील मोलाची ठरत आहे.

अण्णा नंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराने देखील त्यांनी उभारलेल्या संस्थांनी आजही शिक्षण, सहकार, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात कार्यरत राहून  अण्णांच्या विचारांचा वारसा पुढे नेला आहे. त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणजे आज शिरपूर तालुका शैक्षणिकदृष्ट्या संपूर्ण जिल्ह्याचा पथदर्शी ठरत आहे.

अण्णासाहेबांचा वारसा आज त्यांच्या परिवारातील इतर सदस्य अत्यंत जबाबदारीने पुढे नेत आहेत. जुन्या मूल्यांना आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत, शिक्षण व विकासाच्या नव्या दिशा त्यांच्या पुढच्या पिढीकडून उलगडल्या जात आहेत.

स्वातंत्र्य संग्रामातील संघर्ष, शिक्षण क्षेत्रातील क्रांती आणि सामाजिक-राजकीय योगदान या त्रिसूत्रीचा मिलाफ म्हणजे अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर. त्यांच्या कार्याची आठवण केवळ जयंतीच्या दिवशी नव्हे, तर शिरपूर तालुक्याच्या प्रत्येक प्रगतीच्या टप्प्यावर घेतली गेली पाहिजे. "अशा कार्यकुशल, दूरदर्शी आणि सामाजिक जाणिवांनी भरलेल्या महामानवाला निर्भीड विचार परिवाराकडून शतशः प्रणाम!"

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने