"‘मी दिलं का आश्वासन?’ – शेतकरी कर्जमाफी वर अजितदादांची बगल, शेतकऱ्यांचा उद्रेक"
मुंबई प्रतिनिधी -
महायुती सरकारने सत्तेपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं खोटं स्वप्न दाखवत सत्ता मिळवली. पण सत्ता हाती घेतल्यावर ‘निधी नाही’चं कारण पुढे करत आजवर कर्जमाफी बाबत एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरात दिलेलं विधान – “मी दिलं आहे का कर्जमाफीचं आश्वासन?” – शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं ठरत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या थट्टा करणाऱ्या या सरकारमधनं अजित पवार बाहेर पडतील का ? यांची राजकीय अस्मिता जिवंत आहे का ? असे अनेक प्रश्न संतप्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.
अजित पवारांचा हा बगल देण्याचा प्रयत्न म्हणजेच सरकारच्या घोषणांची बेइमानी. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख असताना, आज जबाबदारी झटकून टाकणं म्हणजे जनतेच्या विश्वासघाताची परिसीमा आहे.
दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करत त्यांना ‘पहलगाम हल्यातील अतिरेक्यांपेक्षाही क्रूर’ अशी उपमा दिली. कारण दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मात्र यंत्रणांच्या नियोजनाचे ढोंग करत आहे.
शेट्टींच्या नेतृत्वाखाली माळसोन्ना ते परभणी काढलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत सरकारकडून पाळलेल्या आश्वासनभंगाविरोधात संतप्त निवेदन सादर करण्यात आले.
फडणवीसांनी ‘100 दिवसांच्या सरकार’चं आत्मपरीक्षण करावं – आत्महत्यांचा आकडा तुम्हाला अपयशाचं भेसूर प्रतिबिंब दाखवेल. अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
शेतीला तोट्याचा धंदा करणारी केंद्र-राज्य धोरणं, कंपन्यांचा फायदा आणि नैसर्गिक आपत्तींचं ओझं – यामध्ये अडकलेला शेतकरी आजही न्यायाची वाट बघतोय. पण सत्तेवर येऊन घोषणांपासून दूर जाणारी ही राजवट, केवळ घोषणांची आणि प्रचाराची राजकीय रणनीती असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू तिच्या अजेंड्यात नाहीत. शेतकऱ्यांच्या नशिबी आहे आसमानी आणि सुलतानी संकटे.
त्यामुळे आजपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील कर्जमाफी न करणाऱ्या सरकारकडे आर्थिक परिस्थितीचे कारण होते मात्र खुद्द सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले का ? असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दादा आपण जरी आश्वासन दिले नसले तरी आपण या सरकारच्या एक भाग आहेत, हे आश्वासन सरकारचे आहे, किमान आपण तरी त्यांना आठवण करून द्या, तसे पाहता कर्जमाफी हा विषय नवीन नाही किंवा पहिल्यांदाच कोणते सरकार देत आहे अशाच काही भाग नाही. सरकारनेच शेतकऱ्यांना अशा लावली होती, आता त्याची पूर्ती करावी हीच अपेक्षा.