शिरपूरचा गांजापुर होतोय...? – एक चिंताजनक वास्तव
वास्तव - महेंद्रसिंह राजपूत
शिरपूर तालुक्याचा इतिहास कधी शेतीप्रधान, कधी औद्योगिक प्रगतीचा साक्षीदार राहिलेला असला तरी सध्या या भागाला एका काळवंडलेल्या ओळखीने ग्रासलं आहे—‘गांजापुर’ म्हणून! हे फक्त वायफळ बोलणं नाही, तर यामागे आहे गंभीर सत्य आणि पोलिस कारवायांनी उघड केलेल्या वास्तवाची मालिका. काही काळपूर्वी असाच दाग शिरपूर ला लागला होता तो म्हणजे स्पिरिट चा. अवैध दारू बनवण्यासाठी त्याच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग व्हायचा. कालांतराने ही तस्करी कमी झाली. मात्र आता पुन्हा तालुक्यात गांजापुराण सुरू झाले आहे.
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल कोट्यवधींचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दर दिवसाच्या कारवाईच्या बातम्या येत असतात, कधी तो शेतात सापडतो कधी वाहनात सापडतो कधी मोटरसायकल मध्ये सापडतो कधी लक्झरी बस मध्ये सापडतो तर कधी वन जमिनीवर.
आता तर चक्क पोलिसांनी जमिनीखाली लपवलेला ७० लाखांचा गांजा जप्त केला. त्यामुळे शिरपूर तालुका गांजा हब म्हणून उदयास येत असून त्याची गांजा कनेक्शन इतर राज्यात आणि मुंबईत देखील जोडली जात आहे. शिरपूर एक संगठित तस्करी केंद्र होत चाललंय.
स्थानिक पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथक वेळोवेळी मोठ्या प्रमाणात गांजासाठा हस्तगत करत आहे. तरीदेखील हे सगळं थांबत नाही. इतकी कारवाई असूनही पुन्हा-पुन्हा नव्या ठिकाणी गांजाचे जथ्थे सापडतात. यातून एकच गोष्ट समोर येते— अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या मार्ग म्हणजे गांजा. जणू काही त्याशिवाय उदरनिर्वाहाचे कोणतीच साधने तालुक्यात नाही किंवा हमीभाव मिळेल असे पिकांचे उत्पादन नाही. आर्थिक राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या सर्व परिणामांना जबाबदार नाही ना अशी देखील चर्चा होताना दिसते.
या सर्व प्रकरणांमध्ये एक नवा मुद्दा पुढे आला आहे तो म्हणजे या गांजा लागवडी प्रकरणात वन जमिनीचा वापर गांजाची शेती करण्यासाठी केल्याचे दिसून आले आहे हा केवळ गुन्हा नाही, तर शासकीय मालमत्तेचा सरळसरळ गैरवापर आहे.
काही प्रकरणांमध्ये गांजा सापडूनही आरोपींना अगदी तात्काळ जामीन मिळताना दिसतात. त्यामुळे कायद्यातील पळवाटा, किंवा लवचिकपणा यामुळे कायदा अंमलबजावणीला मर्यादा येत आहेत का ? त्यामुळे हा कायदा अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या साऱ्या गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वात खेदजनक बाब म्हणजे तालुक्याचे दोन्ही आमदार या विषयावर पूर्णतः मौन धारण करून आहेत. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शिरपूरच्या बदनामीकडे बोट दाखवतो, तेव्हा या लोकप्रतिनिधींनी का प्रतिक्रिया दिलेली नाही? का कोणतं धोरणात्मक पाऊल उचललेलं नाही? जनतेच्या प्रतिनिधींचं हे दुर्लक्ष म्हणजे या गंभीर सामाजिक संकटाला राजकीय पाठबळ देण्यासारखं वाटतं. इकडे तालुक्यात शिक्षणावर भर दिला जात असताना गुन्हेगारीकडे केलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे.
या सर्व घटनांमुळे शिरपूर तालुका एका विचित्र वळणावर उभा आहे. एकीकडे तालुक्यात सहकार संपला आहे, शेतकरी प्रकल्प बंद आहे, शेतीमालाला हमीभाव नाही, महागाई , बेरोजगारी वाढत आहे, तर दुसरीकडे गांजाची बेकायदेशीर शेती व तस्करीचा रस्ता रुंदावत चाललाय. तरुण पिढी या मार्गाने वळत आहे का? व्यसनाधीनता वाढते आहे का? हे प्रश्न उभे राहतात.
शिरपूरच्या सामाजिक, नैतिक आणि आर्थिक आरोग्यासाठी गांजाप्रकरणी तातडीची आणि कठोर कारवाई आवश्यक आहे. केवळ पोलीस नव्हे, तर राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अन्यथा शिरपूरची ओळख ‘गांजापुर’ अशीच नकारात्मकतेने ओळखली जाईल.