अपघाताचा बनाव करून 31 टन गहू लंपास! ट्रान्सपोर्टर, ट्रक मालक आणि चालकास अटक
शिरपूर, ता. 18 मे 2025 |
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गहू वाहतूक करताना अपघाताचा बनाव करून तब्बल 31,220 किलो गहू चोरी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मध्यप्रदेशातील सेंधवा येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील दहिवद गावाजवळ घडला. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रान्सपोर्टर, ट्रक मालक आणि वाहनचालक अशा तिघांना अटक केली आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली असून, पोलीस कोठडीत त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
घटनाक्रम असा उलगडला...
दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सेंधवा (म.प्र.) येथील व्यापारी श्री. यश अनिल गोयल (वय 31) यांनी त्यांच्या गुरुकृपा अॅग्रोटेक कंपनीमार्फत 31,220 किलो वजनाचा गहू पुण्यातील सनसवाडी येथे पोहचवण्यासाठी ट्रान्सपोर्टर पवन कुमरावत यांच्याकडे सुपूर्त केला होता. कुमरावत यांनी आकाश बाविस्कर यांच्या मालकीच्या ट्रक (MH 18 BG 8833) मध्ये सदर गहू भरून चालक राहुल जामरे याच्या ताब्यात दिला.
2 मे 2025 रोजी पहाटे साडेसहा वाजता ट्रकचा अपघात झाल्याची माहिती ट्रान्सपोर्टर, ट्रक मालक आणि चालक यांनी श्री. गोयल यांना दिली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दहिवद गावाजवळ ट्रक उलटल्याने गव्हाच्या पोत्यांची चोरी झाली. मात्र, पुढील काही दिवस संपर्क साधूनही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने व संशयास्पद वर्तन पाहून श्री. गोयल यांनी अखेर 16 मे रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासाच्या चक्रात फसवणुकीचा उलगडा
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद बीट व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. यात ट्रान्सपोर्टर पवन कुमरावत (रा. शास्त्री नगर, सेंधवा), ट्रक मालक आकाश बाविस्कर (रा. टॉगोर बेडी नगर पालिका, सेंधवा) आणि ट्रक चालक राहुल जामरे (रा. बोबलवाडी, ता. राजपूर) यांना अटक करून चौकशी केली असता त्यांनी संगनमताने गहू चोरी केल्याची कबुली दिली.
कोणत्या किमतीचा मुद्देमाल?
चोरीस गेलेल्या गव्हाची एकूण किंमत 9,36,600 रुपये असून, तो 574 पांढऱ्या गोण्यांमध्ये भरलेला होता. ही सर्व मालवाहतूक बनावट अपघाताच्या माध्यमातून लंपास करण्यात आली होती.
पोलीसांची कार्यवाही आणि पुढील तपास
या प्रकरणी पोलिसांनी 17 मे रोजी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेल्या गव्हाचा थांगपत्ता लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, पोहेकॉ संतोष पाटील, पोकॉ योगेश मोरे, संजय भोई, भुषण पाटील, चत्तरसिंग खसावद, सागर ठाकुर, राजू ढिसले, संदीप ठाकरे, कृष्णा पावरा आणि मनोज पाटील या सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली.
शिरपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि बारकाईने केलेला तपास यामुळे मोठ्या प्रमाणातील आर्थिक फसवणूक रोखण्यात यश आले असून, हे प्रकरण वाहन अपघाताच्या आड लपवून चोरी करण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या बनावट प्रकरणांना चाप लावण्यासाठी ही कारवाई एक उदाहरण ठरणार आहे.
