धुळे शहरात भरचौकात गोळीबार! दोन आरोपींना अटक; गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त
चाळीसगाव रोडवरील अमन कॅफेजवळ जुन्या वैमनस्यातून जीवघेणा हल्ला; पोलिसांची तात्काळ कारवाई
धुळे | दिनांक 13 मे 2025 रोजी सायंकाळी शहरातील चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन हद्दीतील शंभर फुटी रोडवरील अमन कॅफेजवळ जुन्या वादातून गोळीबार व मारहाणीची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी शाहरुख बाबु शाह (वय 25, रा. मोगलाइ, साक्री रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपींनी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.
फिर्यादी आपल्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी अमन कॅफेजवळ गेले असता, मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी 1) बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट) याने गावठी कट्ट्याने गोळीबार केला, तर त्याचा साथीदार 2) हाशिम मलक अब्दुल रहेमान (रा. मिल्लत नगर) याने मारहाण केली. यामुळे फिर्यादीस गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र, मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रिकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिसांचे शोधपथक सक्रिय झाले. त्यांनी जलद तपास करत आरोपींना अटक केली. आरोपी बिलाल शाह याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक मॅगझीन व 4,000 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईमध्ये पोनि. सुरेशकुमार घुसर, पोनि. श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा व त्यांच्या टीमचा सहभाग होता. यामध्ये पोहेकाँ सुनिल पाथरवट, अविनाश वाघ, पोकॉ शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, पाठक, देवेंद्र तायडे, सिराज खाटीक यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून, शहरातील अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
