*घरकुल आवास प्लस सर्व्हे ची मुदत वाढवा - शिरपूर सरपंच संघटनेची मागणी*
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील गावा-गावांत सद्या ऑनलाईन घरकुल सेल्फ सर्व्हेचे काम चालू आहे. ज्यासाठी शासनाने 30 एप्रिल हि अंतिम मुदत दिली आहे. घरकुल सर्व्हे करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात आज मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना शिरपूर गट विकास अधिकाऱ्यांमार्फत सरपंच संघटनेने निवेदन दिले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुलास मान्यता दिली आहे. 2018 मध्ये आवास प्लस ऑनलाइन सर्वेक्षणामधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या, यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या व सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुधारीत सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी संबंधीत गावातील ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे व स्वत: गावातील ग्रामस्थ देखील आपल्या मोबाईल मधून ऑनलाईन घरकुल सेल्फ सर्वे करीत आहेत तशी सेवा शासनाकडून ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदरहू ऑनलाईन घरकुल सर्वेची अंतिम मुदत 30/04/2025 निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु ऑनलाईन सेल्फ सर्वे करतांना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेल्फ सर्वे करतांना नेटवर्कच्या अडचणीमुळे सर्वे होऊ शकत नाहीय. आदिवासी पाड्यांमध्ये मोबाईल नेटवर्क तसेच बऱ्याच ग्रामस्थांचे आधार अपडेट नाहीत व जॉब कार्ड संबंधित अडचणी असल्यामुळे घरकुल सेल्फ सर्वे बऱ्याच जणांचे बाकी आहेत. म्हणून घरकुल आवास प्लस सर्व्हे ची मुदतवाढ 31/05/2025 पर्यत व्हावी यासंदर्भांत आज सरपंच सेवा महासंघ शिरपूर व सरपंच परिषदे तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना गट विकास अधिकारी श्री प्रदीप पवार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व निवेदनाची प्रत मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांना पाठविण्यात आली.
निवेदन देते वेळी सरपंच संघटनेचे मा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, मा जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सरपंच सेवा महासंघाचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष हेमंत सनेर, पं स माजी सदस्य यतिश सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अहिल्यापुर सरपंच संग्रामसिंग राजपूत, उंटावद सरपंच राजपकपूर मराठे, बलकुवे सरपंच प्रदीप चव्हाण, हिंगोणी सरपंच सोमा भिल, तोंदे सरपंच राहुल चौधरी, हातेड सरपंच कविता रमेश पावरा, लक्ष्मीबाई बबन भिल आदी सरपंच उपस्थित होते.