शिरपूर शहरात उत्कृष्ट आरास साकारणाऱ्या गणेश मंडळाच्या पुरस्कार देऊन सन्मान
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात गणेश उत्सव 2024 या कालावधीत शहरात उत्कृष्ट आरास साकारणाऱ्या व विविध सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणाऱ्या गणेश मंडळांच्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देखील वितरित करण्यात आले.एक सामाजिक जबाबदारी आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रमुख कार्य करणारे न्यूज चॅनल माझा खान्देश व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने सदर पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अस्तित्व फाउंडेशन यांनी देखील मोलाची मदत केली.
सदर कार्यक्रमात कमी वयात अगदी स्वतःचेच पालन पोषण जेमतेम होत असताना शहरातील साई नावाच्या अल्पवयीन मुलाने बेवारस असलेल्या तीन मुलांच्या सांभाळ केला, काळजी घेतली त्यांना वाढवले त्यांना सुरक्षा दिली. एका दिवशी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान सदरचे प्रकार महिला पोलीस अधिकारी छाया पाटील यांच्या लक्षात आला आणि हा सर्व प्रकार उघड झाला.
यानंतर प्रशासनाने या मुलांची जबाबदारी स्वीकारत त्यांना शासन संस्थेकडे सुपूर्द केले. सामाजिक मनाचे भान ठेवून हे प्रकरण हाताळणाऱ्या महिला पोलीस अधिकारी छाया पाटील यांच्या ही सन्मान करण्यात आला.
शिरपूर शहरातील ज्या गणेश मंडळांनी उत्कृष्ट आरास साकारले होते त्यांच्यासाठी एक ऑनलाईन वोटिंग च्या मार्फत स्पर्धा ठेवण्यात आली होती. शिरपूरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि बंपर वोटिंग केले. या आधारेच विजेत्यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा फुले युवा मंच वरवाडे यांनी पटकावला असून यांनी या वर्षाच्या गणेश उत्सवात जम्मू कश्मीर मधील कटरा येथे माता वैष्णव देवीची गुफा व मंदिर यांच्या देखावा साकारला होता.
द्वितीय क्रमांक चे पारितोषिक शहरातील हिंदुत्व प्रतिष्ठान या गणेश मंडळांनी प्राप्त केले. त्यांनी आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली होती.
तृतीय क्रमांक चे पारितोषिक करवंद नाका परिसर सांस्कृतिक गणेश मंडळ यांनी पटकावला. त्यांनी सध्याच्या राजकारणावर आधारित कोणता झेंडा घेऊ हाती या विषयावर देखावा साकारला होता.
चतुर्थ क्रमांक चे पारितोषिक सुभाष कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने प्राप्त केले, त्यांनी केदारनाथ येथील भगवान शिव शंकरांचे मंदिराचा देखावा साकारला होता.
तर उत्कृष्ट गणेश मूर्ती साकारणाऱ्या पाटील वाडा मित्र मंडळ आणि महिला शक्तीने स्थापित केलेल्या नारीशक्ती गणेश मंडळास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना एडवोकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी आणि आयोजक महेंद्र माळी यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, उद्योगपती चिंतन भाई पटेल,मा. कृती बेन पटेल,ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते दिलीप लोहार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के पाटील, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी,धुळे जिल्ह्याचे वाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भूषण अहिरे, शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि पत्रकार बांधव यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.






