" विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी धुळे जिल्हा पोलीस दलाचे वतीने कार्यशाळा "
धुळे प्रतिनिधी - समाजात सध्या बदलत्या जिवनशैलीमुळे १५ ते १८ वयोगटातील मुलांचा वाढत्या गुन्हेगारीकडे कल वाढत असल्याचे दिसून येते. सोशलमिडीयामुळे आताची तरुण पिढी काहीतरी वेगळे करण्याच्या नादात चुकीचे पाऊल उचलतात व आपसुकच गुन्हेगारीकडे वळतात. तसेच काही मुलांच्या कुटुंबातील आर्थिक सामाजिक परिस्थिीती, शिक्षणाच्या आभावामुळे व वाईट संगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढले जातात. त्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठीचा आत्मविश्वास ते गमावून बसतात व भरकटतात. अशाच विधीसंघर्षग्रस्त बालकांना योग्य दिशा व मार्गदर्शन देण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांचे संकल्पनेतून कार्यशाळेचे नियोजन करण्याचे ठरले. त्याअनुषंगाने संपुर्ण धुळे जिल्हयातून विधीसंघर्षग्रस्त बालकांना हेरुन त्यांना सदर कार्यशाळेकरीता आणण्याचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार दिनांक २२/०७/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन हॉल मध्ये सकाळी ११.०० वा. पासुन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये सुरवातीला डॉ. अभिनय दरवडे, बालरोग तज्ञ, संगोपन हॉस्पिटल, धुळे यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांशी मनोरंजनात्मकरित्या संवाद साधला तसेच स्वतः अभिनय केलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून विधीसंघर्षग्रस्त बालकांचे प्रबोधन केले. त्यानंतर श्री. संदिप स्वामी, सचिव (न्यायाधीश) जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, धुळे, श्री. यशवंत हरणे, बालन्याय मंडळाचे माजी सदस्य व पत्रकार, डॉ. अरविंद जोशी, धुळे एज्युकेशन सोसायटी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय विभागाचे सेवानिवृत्त प्राचार्य यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांना वेगवेगळया माध्यमातून उदाहरणे देवून त्यांचे मार्गदर्शन केले.
श्रीमती. फरीदा खान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे. या विद्यालयातील विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीवर एक पथनाट्याचे सादरीकरण केले व त्यातून विधीसंघर्षग्रस्त बालकांना बोधपर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. वैशाली पाटील, मानसशास्त्र प्राध्यापक, विद्यावर्धीनी कॉलेज, धुळे यांनी मुलांच्या मानसशास्त्रावर आधारीत प्रश्नोत्ताराचा कार्यक्रम घेवून त्यांच्याशी संवाद साधुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच डॉ. कावेरी जोशी यांनी देखील विधीसंघर्षग्रस्त बालकांचे विविध खेळ घेवून त्यांचे मनोरंजन करुन त्यामार्फत त्यांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व विधीसंघर्षग्रस्त बालकांना एक प्रश्नावली देवून त्यातून त्यांची मानसिकता व सामाजिक व कौटूंबिक अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला व त्यावर त्यांच्याशी चर्चा करुन त्यांचे मार्गदर्शन केले. मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी सर्व विधीसंघर्षग्रस्त बालकांना मार्गदर्शन केले व अशा बालकांचे वेळोवेळी पाठपुरावा करुन त्यांची सामाजिक सध्यस्थिती कशी आहे तसेच ते गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडले अगर कसे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे देखील पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या प्रत्येक विधीसंघर्षग्रस्त बालकाला एक भेटवस्तू देवून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
सदर कार्यक्रमात एकुण ५० विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन श्रीमती. मृदुला नाईक, पोलीस निरीक्षक, धुळे यांनी केले. कार्यक्रमानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकांना स्नेहभोजन देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
