*लेख - १ जुलै : कृषी दिन*
*वसंतराव नाईक*
*हरित क्रांतीचे जनक*
पत्रकार -रणवीर राजपूत*
गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन,मंत्रालय
*अन्नदाता शेतकरी जर समृद्ध झाला,तर राज्यासह देशही सुजलाम सुफलाम होईल*,हा संदेश देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयाच्या पुसद तालुक्यातील *गहुली* येथे फुलसिंग नाईक यांच्या बंजारा समाजाच्या शेतकरी कुटुंबात झाला.अन् जणू *भटक्या अन् विमुक्त जातींचा कैवारी* उदयास आला.वसंतरावांनी उच्चशिक्षित होऊन समाजातील गोरगरीब,निराधार,गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान द्यावे,अशी वडिलांची इच्छा होती.त्याअनुषंगाने वसंतरावांनी प्रामाणिकपणे वाटचाल केली.शालेय जीवनापासूनच त्यांची बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख होती.पुढे त्यांनी नागपूरच्या मॉरिश कॉलेजमध्ये बी.ए.अन् नंतर एल.एल.बी.ची पदवी संपादन केली.भटक्या,विमुक्त व अन्य मागास जातींच्या घटकांना न्याय मिळावा,त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत,या प्रांजळ उद्देशाने त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू करून गरजूंना न्यायालयीन कामकाजात मोफत सेवा प्रदान केली.परंतु केवळ वकिली करून दिनदुबळ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत,हे लक्षात आल्यावर त्यांनी
*समाजकारणासाठी राजकारणात* पदार्पण केलं.
प्रारंभी वसंतराव हे १९६४ मध्ये पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले.अन् तेथूनच त्यांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली.नंतर त्यांनी पुसद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषविले.विशेष म्हणजे १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेवर निवडून आल्यावर ते जुन्या मध्यप्रदेशाच्या मंत्रिमंडळात महसुल खात्याचे उपमंत्री झाले.सन १९५६ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या
द्विभाषिक मंत्रिमंडळात त्यांनी सहकार मंत्री तर,१९५९ साली कृषी मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.महत्वाचे म्हणजे १ मे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल मंत्र्याची धुरा सांभाळली.अशाप्रकारे राजकीय क्षेत्रात त्यांनी
चढत्याक्रमाने यशस्वी घोडदौड केली.इतकेच नव्हे तर,नाईकसाहेबांनी पुढे सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करून राज्याच्या राजकारणात त्यांची अजातशत्रू व वादातीत राज्यकर्ते म्हणून ओळख झाली.नाईकसाहेबांना आपल्या कार्यकाळात
सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविताना अग्नीदिव्यातून जावे लागले होते.कारण त्यांच्या कार्यकाळात दोन युद्धे आणि तीन दुष्काळांना सामोरे जावे लागले.तरी अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांचा महाराष्ट्र हा ताट मानेने उभा राहिला.कोणापुढे झुकला नाही.राज्याचा सर्वांगीण विकास साधतांना,भटक्या व विमुक्त जातींतल्या लोकांच्या शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक विकासासाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं.या पार्श्वभूमीवर च भटक्या-विमुक्त जनजातींचे लोक वसंतराव नाईक यांना आपलं *दैवत* मानतात.
*दर्जेदार कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा*,असा शेतकऱ्यांना संदेश देऊन नाईकसाहेबांनी हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल केली.१९७२ च्या भीषण दुष्काळाने साऱ्या राज्यात कहर केल्याने शेतकरी,
शेतमजूर,कामगार व
हाता-पोटावर जीवन जगणाऱ्या कष्टकरी लोकांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न अतिशय जटिल झाला होता.या बिकट परिस्थिती तून मार्ग काढण्यासाठी वसंत रावांनी *रोजगार हमी योजने* ची संकल्पना मांडली.या योजनेअंतर्गत शेती व शेतीपूरक कामे मिळत गेल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला.ही अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा मान मिळाला. तत्कालिन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी या योजनेची मुक्तकंठाने प्रशंसा करून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं त्यांनी अभिनंदन केलं.राज्यातील लोकांना अवर्षण काळात धीर देताना ते म्हणाले की,*दुष्काळाच्या परिस्थितीतही महाराष्ट्रातील माणसं कुणाच्या दयेवर जगणार नाहीत*,*तर
काबाडकष्ट करून,मानाची चटणी-भाकर मिळवतील,पण कोणापुढे हात पसरणार नाहीत*.विशेष म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमानी इतिहास कोणाला बदलता येणार नाही".वास्तविक पहाता,वसंतरावांनी राज्यातील शेतकरी,कष्टकरी कामगार,शेतमजूर यांना संकटकाळातही ताट मानेनं जगण्याची शिकवण दिली. *मोडेल पण वाकणार नाही* हा बाणा त्यांनी राज्य प्रमुख म्हणून स्वतःही जपला व लोकांनाही जपण्यास प्रवृत्त केलं.राजकारणातून समाजकारण कसं करावं,हा बाळकडू नाईकसाहेबांनी राज्यकर्त्यांना दिला.वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली,याबद्दल राज्य सरकारने त्यांचा १ जुलै हा जन्म दिवस राज्यात *कृषी दिन* म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
नाईकसाहेबांनी अवर्षण काळात राज्यातील लोकांना पाण्याचे महत्व व उपयुक्तता काय याची शिकवण दिली.घरा-घरांच्या अवतीभोवती प्रत्येकाने एक-एक झाड लावावे अन् त्याची मशागत करावी.शेतांच्या बांधांवर वृक्षारोपण करून शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या जमिनीच्या कणाकणात समृद्धी फुलवावी.तसेच नद्या नाल्याचे पाणी अडवा व ते जमिनीत जिरवा.तसे न जमल्यास,घागरीने पाणी आणून आपल्या जमिनी ओल्या करा,असा संदेश त्यांनी बळीराजाला दिला.नदी नाल्यांवर बंधारे बांधण्याची त्यांनी योजना आखली.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या,*वसंत बंधारे* उभारण्यास पुढच्या काळात शेतकऱ्यांनी पसंदी दर्शविली. पर्यावरणाचे रक्षण अन् संवर्धन करणारे नाईकसाहेब हे खऱ्या अर्थानं *पर्यावरणप्रेमी*होते,हे निष्पन्न होते.
नाईकसाहेबांच्या मते *आजचा शेतकरी हा उद्याचा कारखानदार व्हावयास पाहिजे*.या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यात साखर कारखाने,सुत गिरण्या,कुक्कुटपालन पशुपालन,दुग्धव्यवसाय सुरू करण्यास चालना दिली.वास्तवात त्यांनी शेतकऱ्यांना उद्यमशील होण्याचा महामार्ग दाखविला.यावरून नाईकसाहेब हे शेतकऱ्यांचे हितचिंतक होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.
*मराठी* ही राज्यातील लोकांची बोली भाषा असल्याने,नाईकसाहेबांनी आपल्या कार्यकाळात प्राधान्याने तिला
राजभाषेचा दर्जा देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील
सर्वसामान्य लोकांना शासकीय कामकाजातील नियम,कायदे समजणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय अन् संवाद साधणे सुकर झाले आहे.सरकारी कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य झाल्याने शासनस्तरावर जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तथा कामे यांचा निपटारा जलदगतीने होऊ लागला आहे.मराठी राजभाषेला लोकाभिमुख करण्याचे सर्वस्वी श्रेय
नाईकसाहेबांना जाते.याबद्दल राज्यातील मराठी माणूस हा
नाईकसाहेबांचा ऋणी आहे.
कृतज्ञतेच्या भावनेतून राज्य शासनाने राज्यातील भटक्या- विमुक्त जातीच्या लोकांनाà रोजगार-स्वयं रोजगारसाठी अल्प दराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्याच्या उद्देशाने सन १९८४ मध्ये *वसंतराव नाईक वित्त व विकास महामंडळ* स्थापन केले.राज्यातील अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर,कामगार,कष्टकरी या घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्यातील
महायुतीचे शिंदे सरकार हे स्व.वसंतराव नाईक यांचा आदर्श घेऊन यशस्वी वाटचाल करत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते योग्य तो समन्वय साधत शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावलं उचलत असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळत आहे.राज्यातल्या शिंदे सरकारने असंख्य शेतकऱ्यांचे कृषी पंपाची बिलं माफ करण्याची चालू अधिवेशनात घोषणा केली आहे.तसेच अतिवृष्टी व गारपिटीने शेती पिकांचे नुकसान झाले,त्या शेतकऱ्यांना वेळोवेळी
अर्थसहाय्य केलं आहे. त्याची परिणती म्हणजे महायुतीचे सरकार *आपलं सरकार* आहे,ही जाणीव बळीराजाच्या मनात निर्माण होताहे,हीच शिंदे सरकारची खरी फलश्रुती आहे.
चला तर,आपण सर्वजण लोकसहभागातून राज्यात पुनश्च *हरित क्रांती* निर्माण करण्यास सरकारला हातभार लावूया अन् लोकनेते वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार करूया!
Tags
news