शहादा आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहाला लागली गळती
शहादा - प्रतिनिधी सुमित गिरासे
बाहेरील आगारातून एसटी बस मुक्कामी घेऊन आलेल्या वाहक चालकांसाठी आगाराच्या वतीने बसस्थानकात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु शहादा आगारात असलेल्या विश्रामगृहाला पावसात चक्क गळती लागत असल्याने रात्र जागरण करून काढावी लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले असून, आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने बसचालक वाहकांना रात्र काढणे अवघड होत असल्याचे पाहावयास मिळाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील प्रवाशांना होतो. राज्यातील अनेक शहरांत लांबपल्ल्याची एसटी बस मुक्कामाला थांबून सकाळी लवकर येते. त्यामुळे सकाळी लवकर इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या प्रवाशांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांची मोठी सोय होते; मात्र प्रवाशांची सेवा करीत असताना शहादा आगारात मुक्कामाला थांबणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांच्या विश्रामगृहाला गळती लागत असल्याने रात्र जागरण करून काढावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे झोप होत नसल्याने बस चालवताना डुलकी येऊन अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी मुक्कामी थांबणाऱ्या बसचालक वाहकांसाठीपिण्याचे स्वच्छ पाणी, आराम करण्यासाठी बेड, अंथरुण-पांघरुण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; परंतु मुक्कामी थांबलेल्या चालक वाहकांना स्वतःसोबत अंथरुण, पांघरुण आणावे लागते. तसेच खाली फरशीवरच रात्र काढावी लागते. तर स्थानिक चालक-वाहकांसाठीच्या विश्रामगृहाची तर दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधितअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
*कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या जीवाशी खेळ*
■ लांबपल्ल्त्याहून थकून आलेल्या वाहक-चालकांसाठी प्रत्येक आगारात विश्रामाची सोय करण्यात येत असते; परंतु शहादा आगारातील विश्रामगृहालाच गळती लागल्याने येथील वाहक चालकांना झोपमोड करीत जागरण करून रात्र काढावी लागत असल्याचे चित्र असल्याने सकाळी उठून बस चालविताना डुलकी येऊन अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी व सह प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.