आणीबाणी विरोधातील आंदोलनाचे योद्धा स्व.भाऊसो . पद्मसिंह सिसोदिया (पदम मास्तर) यांचे आज आणीबाणी विरोधातील 'काळा दिवसानिमित्त' त्यांच्या कार्याचे स्मरण !
लेखक: श्री. जयपालसिंह गिरासे , शिरपूर
काही गावे अशी असतात की , जांच्या वरून माणसं ओळखली जातात.....परंतु काही माणसे अशी असतात कि जांच्या वरून गावे ओळखली जातात.....अशीच एक ओळख निर्माण केलेले किंबहुना ज्यांच्या नावावरून सुराय ह्या गावाचे नाव अखिल भारतात ओळखले जाऊ लागलेले होते त्या गावाचे आद्य नागरिक.....जनसंघाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक म्हणून स्व. भाऊसाहेब पद्मसिंहजी नाटुसिंहजी सिसोदिया उर्फ पदम मास्तर यांचा परिचय देता येईल.
भाऊसाहेबांचा जन्म २ जून १९२० रोजी त्यांच्या आजोळी अहिल्यापूर (ता.शिरपूर) येथे झाला. त्यांचे घराणे सुराय येथील जमीनदार घराणे म्हणून ओळखले जाई. पाच भाऊ आणि पाच बहिण अशा एकूण दहा भावंडा मध्ये भाऊसाहेब हे थोरले होते. गोकुळा सारखे मोठे घराणे व भरपूर जमीन-जुमला असल्याने दारी वैभव नांदत होते. लहान पणापासून जोर-बैठका ; घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठीमार, पोहणे आदी मर्दानी प्रकारात त्यांनी आपले नाव कमावलेले होते. लाठीमाराच्या कौशल्याबाबत तर त्यांचा हाथ कोणीही धरू शकत नव्हता ....या कलेमुळे अनेकदा त्यांचा चोर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रतिकार करताना उपयोग झालेला होता. भरपूर व्यायामामुळे त्यांनी बलदंड शरीर यष्टी कमावलेली होती. त्यांचा आहार पाहून भले-भले पहेलवान दचकत असत. ते कधीही आजारी पडलेले नव्हते. कच्या भाज्या आणि चणे-शेंगदाणे हा त्यांचा आवडता खुराक होता.घरीच प्राथमिक अक्षरे गिरवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी धुळे येथील इंग्रजी शाळेत त्यांचे नाव दाखल करण्यात आले होते . जुनी matrik पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलेले होते. लहानपणी आज्ञाधारक बालक म्हणून ते ओळखले जात. सुटीत धुळे येथून परत येताना त्यांच्या जवळचे भाड्याचे पैसे एका गरजू मुलास त्यांनी दिले होते व स्वत: पायी प्रवास केला होता या वरून बालपणीच दातृत्वाचे संस्कार त्यांच्या मनावर किती खोलवर रुजलेले होते याची प्रचीती येते. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी संघाची उभारणी जोरात चालविलेली होती.
धुळे येथील संघाच्या शाखेचे ते प्रथम स्वयंसेवक होते. संपूर्ण परिसरात ते मास्तर म्हणून परिचित होते.
घरचे जमीनदार असल्याने व त्या काळात नोकरी कमी प्रतीची मानली जात असल्याने शेती साठी ते घरी परतले. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी पुणे येथे संघ शिक्षक म्हणून अल्प काल सेवा बजावली होती. संघाचे विविध शिबिरे देशभर होत....भाऊसाहेब प्रत्येक शिबिरात सहभागी होत. १९४४ मध्ये सुराय या आपल्या गावी त्यांनी संघाची शाखा सुरु केली .... या शाखेत गावातील मुले आणि युवक मोठ्या उत्साहात सहभाग घेत.....राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांनी आपल्या मातीत रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो काल पारतंत्र्याचा होता.....नेताजी बोस यांचे चरित्र त्यांना नेहमीच खुणावत असे. भूमिगत कार्यकर्त्यांच्या निरोपाची ने-आन त्यांचा बाल चमू शिताफीने करीत असे....इंग्रज पोलिसांची नजर त्यांचेवर नेहमी असे परंतु त्याचा थांगपत्ता ते कधीही लागू देत नसत. त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला होता. त्यासाठी ते सुराय ते थेट गोव्यापर्यंत सायकलीने प्रवास केला होता. नागपूर येथील ओ.टी .सी. शिबिरात सहभागी झाल्यानंतर धुळे जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली. या काळात संघाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या संपर्कात ते असत. १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर संपूर्ण देशभर धरपकड करण्यात येत होती......त्यात भाऊसाहेब सुद्धा चार महिने तुरुंगात होते. स्वत:ची धर्मपत्नी वारल्या तरीही सरकारने त्यांची parol वर सुटका केली नव्हती. तुरुंगवासातून परतल्यानंतर भाऊसाहेब गावो-गावी गेले व संघाच्या शाखांची उभारणी जोमाने केली. याच काळात त्यांचा रामी येथील जमीनदार स्व.इंद्रसिंग जी जाधव यांची कन्या रुखत कुंवर यांचेशी दुसरा विवाह झाला.
१९५२ च्या दुष्काळात लोकांना मदत म्हणून गुरांची छावणी निर्माण करून मुकी जनावरे वाचविण्याचे प्रयत्न केले. दुष्काळी केंद्र उभारून रेड-क्रॉस च्या मदतीने दुष्काळ ग्रस्तांना धान्य -कपडे- दुध-भाजी भाकरी आदी वाटप त्यांनी केले. घरचे जमीनदार असलेल्या भाऊसाहेब यांनी गोर-गरिबांसाठी आपले धान्याचे कोठार सदैव खुले ठेवलेले होते.....त्यांच्या पूर्वजांना कवाड मध्ये मिळालेली जमीन जेथे होती तेथे आदिवासी भिल्ल जमातीच्या लोकांची वस्ती त्यांनी वसविलेली होती...जी मंडळी त्यांच्या शेतांवर काम करीत असे. कवाड या नावावरून त्या गावाचे नाव कवाडे व नंतर कलवाडे असे झाले. या संपूर्ण वस्तीत भाऊसाहेब यांचा पितृवत सन्मान केला जाई. त्यांनी तालीम दिलेले ;शिक्षणात मदत केलेले अनेक व्यक्ती आज महत्तम पदांवर पोहोचलेले आहेत. एका हाथाने दिलेले दान दुसऱ्या हातालाही ते कळू देत नसत. सायकल हे त्यांचे आवडते वाहन. पुणे-मुंबई-धुळे येथे ते आवर्जून सायकलीने जात असत.
१९५९ मध्ये सुराय ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्या काळात लोकसहभागाने गावातील प्रश्न त्यांनी सोडविले होते. आपल्या सरपंच पदाच्या काळात त्यांनी घरून जेवणाची सोय करून गावकऱ्यांच्या मदतीने सुराय ते मालपुर अशी चार कि.मी. लांबीची सडक तयार केली होती. गावात शाळा सुरु केली.अधिकारी वर्गात त्यांच्या प्रती प्रचंड आदर व दरारा होता. १९६२ मध्ये त्यांचे स्नेही उत्तमराव पाटील यांनी लोकसभे साठी तर भाऊसाहेब यांनी विधानसभेसाठी जनसंघातर्फे दिवा या चिन्हावर निवडणूक लढविली होती. पूर्ण मतदारसंघ हा सायकलीवर पिंजून काढला होता. तेव्हापासून जनसंघाचे नेते म्हणून त्यांनी कार्य सुरु केले. परमपूज्य हेडगेवारांच्या जीवनापासून आदर्श घेतलेले भाऊसाहेब १९७६ मधील आणीबाणी च्या काळात कारावासात होते. याच काळात त्यांची स्व अटलबिहारीजी वाजपेयी ; स्व मोरोपंतजी पिंगळे; स्व नानाजी देशमुख ; स्व रज्जू भैय्या ; स्व हशू अडवाणीजी आदी मंडळीच्या सहवासात कालक्रमणा सुरु होती. राजकैदी म्हणून नाशिकच्या कारागृहात आठ महिने ते होते....तत्पूर्वी दहा महिने भूमिगत राहिले....व लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांचे सोबत तीन दिवस थांबून नागपूर ---गोरखपूर--पुणे--मुंबई--ग्वाल्हेर--जयपूर इ. ठिकाणी त्यांनी भूमिगत राहून प्रचार केला. रामी येथे एका पारवारिक समारंभास आलेले असताना खबऱ्यांनी पोलिसांना गुप्तरित्या माहिती पुरविली आणि भाऊसाहेब यांना अटक झाली. विशेष म्हणजे आणीबाणी विरोधातील या लढ्यात सुरायसारख्या चिमुकल्या गावातील तब्बल ७ व्यक्तींनी तुरूंगवास भोगला होता. सुराय गावाला जनसंघाचा बालेकिल्ला म्हणत. परंतु पक्षिय संकीर्ण विचारधारेला त्यांनी थारा दिला नव्हता. अन्य पक्षाच्या नेत्यांशी सुध्दा त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माजी आमदार श्री बापूसाहेब रावल हे विधानसभेला रेड्डी काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी करत होते. सुराय ग़ाव हे जनसंघाचे गाव. गावात उगाचच वैचारिक फूट नको म्हणून श्री बापूसाहेब रावल यांनी सुराय गावात प्रचारासाठी भेट दिली नव्हती. परंतु या गावाने श्री बापूसाहेब यांना भरभरून मतदान केले होते.
गरजवंतास मदत करणे; दुर्बलांचे रक्षण करणे ; प्रसंगी लोकहितासाठी पदरमोड करणे ; गोर-गरिबांच्या दु:खात सहभागी होणे हि त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचे शेतीवर केलेले प्रयोग पाहून अनेक शेतकरी थक्क होत. विविध प्रकारची फुलझाडे; फळ झाडे; आमराई; भाजीपाला; कोंबड्या-शेळ्या -ससे --कबुतरे आदींची मळ्यात रेलचेल असे.....त्यांचा मळा म्हणजे भरलेले गोकुळ वाटे....अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या शेतावर येवून गेलेली होती....भाऊसाहेब यांना फक्त दोन कन्या आहेत. मोठ्या सौ आशाताई व लहान सौ लताताई . भाऊसाहेब यांनी आपल्या मुलींवर उच्च संस्कार केलेले होते. श्री लखन जी भतवाल; स्व.उत्तमराव पाटील; स्व.दिलवरसिंग पाडवी ; स्व.प्रल्हादराव पाटील; श्री डॉ कांतिलालजी टाटीया, नारायण फौजदार; स्व.रजेसिंग गुरुजी ; स्व.अजबसिह भाऊसाहेब ;स्व हासरसिंहजी भाऊसाहेब, स्व शिवाजीदादा (सुराय), स्व. नानाजी जोशी , स्व. पुंडलिक मास्तर आदी त्यांचे खास स्नेही होते. मालपुर येथील स्व. मेजर साहेब; स्व.तखतसिंहजी रावल; स्व. विजयसिंहजी रावल आणि स्व. नरेंद्रसिंहजी रावल आदी त्यांचे परम मित्र होते. त्यांनी राजकारणविरहीत मैत्री जोपासली होती. आपल्या आयुष्यात निस्वार्थी पणे सदैव कार्यरत ते राहिले. कधीही जमा-खर्चाची तमा केली नाही.....भौतिक जीवना पेक्षा निसर्ग सहवासाचा त्यांना अधिक ध्यास होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह ही त्यांची दैवते. त्यांचा आदर्श त्यांनी नेहमी जोपासला. भाऊसाहेब रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध होते. ओठात एक अन पोटात दुसरे असा त्यांचा स्वभाव नव्हता.
विजयादशमी च्या आदल्या रात्री त्यांनी गावातील स्वयंसेवकांना सूचना केली कि उद्या आपणास शस्र-पूजन आणि सामुहिक संचालन करावयाचे आहे...म्हणून तयारी करून ठेवा .....दुसऱ्या दिवशी पहाटे ते झोपेतून उठले. घरगडी अंगणात शेणाचा सडा टाकत होता ...त्याचेशी बोलत असतांना भाऊसाहेब ओट्यावर बसले ते पुन्हा कधीही न उठण्यासाठी......! विजयादशमीच्या दिवशी सकाळी दि.१४/१०/२००२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेब यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता....सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलेले होते....त्यांच्या अंत्ययात्रेत गणवेशधारी स्वयंसेवकांनी संचलन केले होते. बालपणापासून मला स्वतःला स्व. भाऊसाहेबांचा सहवास व प्रेम लाभलेले होते. हे माझे भाग्यच.
आज संपूर्ण राष्ट्र आणीबाणीची आठवण म्हणून या दिवसाला काळा दिवस म्हणून साजरा करत असतांना ज्यांनी प्रत्यक्ष आणीबाणीच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता अशा खान्देशच्या भूमिपूत्रांचे स्मरण करणे अगत्याचे ठरते.
शत-शत नमन