*ज्येष्ठ नागरिकाला निर्वाह भत्ता द्या*
*पिठासिन अधिकाऱ्यांचा आदेश*
*अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या प्रयत्नांना यश*
पिंपळनेर - श्री. गुलाबराव रामचंद्र शिंदे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या पत्नीसह इंदिरानगर येथे वास्तव्याला आहेत. त्यांना संदीप व प्रविण ही दोन मुले असून ती आपल्या ज्येष्ठ आई-वडिलांचे पालन पोषण करीत नसल्यामुळे त्यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 च्या कलम 5(1) प्रमाणे निर्वाह भत्ता मिळण्यासाठी चा अर्ज पिठासिन अधिकारी जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे. यांच्याकडे दि.12- 3 -2024 रोजी केला होता. त्याबाबत पिठासिन अधिकारी यांनी दोघी मुलांना नोटीसाकाढुन त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्याबाबत सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर दि. 14- 6- 2024 रोजी आदेश पारित करण्यात आला. त्यात मोठा मुलगा संदीपने 4000 रुपये व लहान मुलगा प्रविणने 3000 रुपये ज्येष्ठ नागरिक श्री. गुलाबराव रामचंद्र शिंदे यांना दरमहा निर्वाह भत्ता देण्याचा आदेश झाला. सदर आदेशाचे पालन न झाल्यास आई वडिल व ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 अन्वये तीन महिन्यांचा कारावास किंवा पाच हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहतील. या संपूर्ण प्रकरणात अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे अध्यक्ष श्री.प्रविण थोरात यांचे बहुमोल सहकार्य लाभले.