शेतमजूराचा मुलगा अजय पावरा महागड्या क्लासेसवीना झाला एमबीबीएस*



*शेतमजूराचा मुलगा अजय पावरा महागड्या क्लासेसवीना झाला एमबीबीएस*


शिरपूर प्रतिनिधी,
              तालुक्यातील शेमल्या येथील शेतमजूर भायसाब पावरा यांचे सुपुत्र अजय  पावरा हे जिद्द व कठोर मेहनतीने डॉक्टर झाला आहे. त्याने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्याने शेमल्या गावाच्या नावलौकीकात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

            डॉ. अजयची लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनाशी होती. जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अजयमध्ये बालपणापासून चमकत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. काम कितीही कठीण असले तरी कठोर मेहनत व आत्मविश्वाने, प्रामाणिकपणे काम करण्याची त्याच्या सवयीमुळे आज तो एमबीबीएस झाला. मजूर आई-वडीलांची भक्कम साथही त्याच्या पाठीशी होती. डॉ. अजयचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण आर. सी.पटेल. आश्रम शाळा शिरपूर आणि जेड.बी.पाटिल (जय हिंद ट्रस्ट)  ज्युनिअर कॉलेज देवपुर, धुळे  येथे झाल्यानंतर त्याने नीटची तयारी केली. शालेय जीवनापासूनच यशाचे शिखर गाठण्याचा आत्मविश्वास अजयच्या विविध गुणगौरव सोहळ्यात दिसून येई.
आपल्या संघर्षमय जीवनप्रावासात मेहनतीची आस धरणारा अजय आपल्या माता पिता, आपले गाव यांच्याविषयी तितकाच कृतज्ञ आणि उपकृत आहे.
    आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही महागड्या क्लासेसचा आधार न घेता आपल्या अथक कठोर परिश्रमातून अजयने नीट परीक्षा यशस्वीरित्या  उत्तीर्ण होऊन कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

विशेषतः कठोर परीश्रम व सुयोग्य नियोजनाच्या बळावर त्याने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. सामान्य परिवारातील तरुण डॉक्टर झाला, ही बाब  शेमल्या गावासाठी  तसेच आश्रमशाळेतील  विदयार्थ्यांसाठी अभिमास्पद आहे. डॉ.अजयचे प्रेरणा स्थान हे माता पिता, कुटुंब आणि शिक्षकांनी दिलेला आत्मविश्वास होय.परिवाराची हालाखीची परिस्थिती बदलण्याची जिद्द आणि  राष्ट्राला आपल्या  वैद्यकीय सेवेतून एक निरोगी समाज निर्माण करण्याचा ध्यास यांच्या बळावर अजयने एम बी बी एस पदवी मिळवत अद्वितीय यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे तालुक्यातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने