किसान संघटनेचा लढवय्या नेता कॉम्रेड अतुल कुमार अंजान यांचे निधन
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिवालयाच्या वतीने कॉ अतूलकुमार अंजान यांच्या अकाली निधनाची वार्ता देताना दु:ख व्यक्त करण्यात आले आहे . अतुल कुमार अंजान हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे राष्ट्रीय सचिव तसेच अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते उपचारा दरम्यान वयाच्या 70 व्या वर्षी आज दि 3 मे रोजी पहाटे 3.40 च्या सुमारास लखनौ येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली .
कॉ अतूलकुमार अंजान यांचे वडील डॉ. ए.पी. सिंग हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी HSRA (हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन) च्या अनेक आंदोलनात सक्रिय भाग घेतला यामुळेच त्यांना ब्रिटिश तुरुंगात दीर्घ काळ शिक्षा भोगावी लागली. त्यांच्या परिवारास क्रांतीकारी स्वातंत्र लढ्याचा वारसा आहे.
वयाच्या 20 व्या वर्षी अंजान नॅशनल कॉलेज स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. विद्यार्थी चळवळीत अत्यंत लोकप्रिय असलेले अंजान सलग चार वेळा लखनौ विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. अर्धा डझन भाषांवर त्यांची पकड होती सबंध भारतात प्रतिभावान वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. अतूलकुमार अंजन यांनी विद्यापीठाच्या कार्य काळातच भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला .
अतूलकुमार यू.पी.च्या प्रसिद्ध पोलीस-पीएसी बंडातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. अतूलकुमार अंजान यांनी आपल्या राजकीय प्रवासातील चार वर्षे नऊ महिने तुरुंगवास भोगावा . त्यांच्या राजकीय आणि वैचारिक विश्वासामुळे आणि विद्यार्थ्यांच्या चळवळींचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे ते 1979 मध्ये लुधियाना परिषदेत AISF चे अध्यक्ष बनले आणि 1985 पर्यंत या पदावर कार्यरत राहिले.
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि अखेरचा श्वास घेत असतानाही ते पक्षातच राहिले. 1989 मध्ये कोलकाता येथे झालेल्या 14 व्या काँग्रेसमध्ये ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेवर निवडून आले.
1992 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या 15 व्या काँग्रेसमध्ये त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी समितीवर निवड झाली आणि 1995 मध्ये दिल्ली येथे 16 व्या काँग्रेसमध्ये ते राष्ट्रीय सचिवालयाचे सदस्य झाले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हे पद कायम ठेवले.
अतूलकुमार त्रिशूर नॅशनल कॉंग्रेस 1997 मध्ये अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस झाले आणि 2001, 2006, 2010 आणि 2016 मध्ये सातत्याने सरचिटणीस पदावर निवडून आले.
कॉ अतूलकुमार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध होते. स्वामीनाथन आयोगात त्यांनी एकमेव शेतकरी सदस्य म्हणून दिलेले योगदान उल्लेखनीय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आधारित 50% मुनाफ्यावर एमएसपीसह अनेक शिफारसी त्यांनी केल्या.
कॉ.अतुल कुमार अंजान यांनी देशभरात विद्यार्थ्यांची चळवळ, किसान चळवळ आणि पक्षाची उभारणी करण्यात उत्कृष्ट भूमिका बजावली. उजव्या विचारसरणी - फॅसिस्ट शक्तींविरुद्ध च्या लढ्यातील ते एक निडर सेनानी होते . त्यांच्या निधनाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि देशातील सध्याच्या परिस्थितीत किसान चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
कॉ. अतूलकुमार अंजान यांना आदरांजली अर्पण करताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची आणि सर्व प्रकारच्या शोषण आणि भेदभावापासून मुक्त नवीन भारत घडवण्यासाठी त्यांचा लढवय्या वारसा पुढे नेण्याचे आवाहन करत आहे.
-: महाराष्ट्र राज्य किसान सभा AIKS
