बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात
शिरपूर फर्स्टच्या संघर्षाला यश..
शिरपूर फर्स्ट ने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.या महामार्गाच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात झालेली आहे.
शिरपूर फर्स्ट च्या वतीने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व्यापक आंदोलन छेडले होते. हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे.यासाठी विविध पातळीवर शिरपूर फर्स्ट च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यात जनसंवाद यात्रा,रास्ता रोको, खड्ड्यांची आरती, प्रशासनाला- लोकप्रतिनिधींना निवेदन, पंतप्रधान यांना पत्र व्यवहार अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते.
आताच गुढीपाडव्यानिमित्त शिरपूर फर्स्ट च्या वतीने नागरिकांना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.शिरपूर फर्स्ट च्या वतीने प्रशासनाला बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग दुरुस्तीची गुढी प्रशासन कधी उभारणार ? असा प्रश्न करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर अशा आशयाचे शुभेच्छा फलक शिरपूर फर्स्ट च्या युवकांनी झळकावले होते.
शिरपूर फर्स्ट या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे. बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाची दुरुस्तीला दिनांक २६ पासून सुरुवात झालेली आहे. पंधरा दिवसात संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिरपूर फर्स्ट च्या आंदोलनाचे हे यश आहे.
कितीतरी महिन्यांपासून खराब असलेला ह्या रस्त्याची आता दुरुस्ती होत आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. रस्ता अतिशय खराब असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूकदारांना मोठा अडथळा येत होता.तर बऱ्याच ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढलेले होते.
सदर रस्त्याची दुरुस्तीची सुरुवात आता सावेर - भोरखेडा गावाच्या दरम्यान सुरू झालेली आहे.पंधरा दिवसात या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी व नागरिकांनी शिरपूर फर्स्ट चे अभिनंदन केले आहे.
शिरपूर फर्स्ट च्या वतीने आज भोरखेडा- सावेर दरम्यान सुरू झालेल्या दुरुस्ती करण्याच्या ठिकाणी जात या दुरुस्ती करणाच्या कामासाठी काम करणाऱ्या मजुरांना सरबत वाटून त्यांचेही आभार मानले.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झालेला होता. नागरिकांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.याच्या दुरुस्ती साठी शिरपूर फर्स्ट च्या वतीने व्यापक आंदोलन आम्ही घेतलेले होते. या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे.
गेल्या दशकभरापासून अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्ग दुरुस्ती पासून वंचित होता, ह्या महामार्गाच्या दुरुतीकरणासाठी शिरपूर फर्स्टने संघर्ष केला. जनसंवाद यात्रा काढून स्वाक्षरी मोहीम राबविली, लोकप्रतिनिधींना निवेदन केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी व NHAI ला १०० पत्र पाठविले, रास्तारोको केला, आंदोलन केले, आणि आज खऱ्या अर्थाने प्रामाणिक संघर्षाला यश मिळाले. अश्याच जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन शिरपूर फर्स्ट संघर्ष करत राहील असे शिरपूर फर्स्टचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितले..
