मतदार व कार्यकर्ते यांनी साथ न दिल्यास शिरपूरची आमदारकी धोक्यात? लोकसभेत लीड द्या ,नाहीतर आमदारकी विसरा, महाराष्ट्रात मिशन 45 साठी भाजपचे धोरण लोकसभा रणांगण - महेंद्रसिंह राजपूत





मतदार व कार्यकर्ते यांनी साथ न दिल्यास शिरपूरची आमदारकी धोक्यात?

लोकसभेत लीड द्या ,नाहीतर आमदारकी विसरा, महाराष्ट्रात मिशन 45 साठी भाजपचे धोरण

लोकसभा रणांगण - महेंद्रसिंह राजपूत

राज्यात लोकसभेचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली आहे. मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यासाठी ही निवडणूक जरी लोकसभेची असली तरी ती विधानसभेची नांदी ठरणार आहे. याचे कारण आहे भारतीय जनता पार्टीचे धोरण. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक आमदारस आपापल्या विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारासाठी लीड देण्याचे आव्हान दिले असून ज्या विधानसभा क्षेत्रात मतांचे लीड मिळणार नाही त्या आमदारांनी आमदारकी विसरावी असा इशारा दिला आहे.

शिरपूर तालुका हा नंदुरबार मतदार संघात मतदान करतो. या मतदारसंघात मागील दोन पंचवार्षिक निवडणुकी  पासून खासदार असलेल्या डॉक्टर हिनाताई गावित हे पुन्हा उमेदवारी करत आहेत. सत्तेत राहिल्यानंतर ची नाराजी आणि इतर तालुक्यातील विरोधकांची एकजूट, केंद्र सरकारवर असलेली मतदारांची नाराजी इत्यादी सर्वच विषय या निवडणुकीसाठी महत्त्वाचे असल्याने यावेळी विजय मिळवणे भाजपासाठी तारेवरची कसरत ठरू पाहत आहे. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रात कोणतीही मोदी लाट नाही.नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यात विरोधक सक्षमपणे विरोध करत असल्याने भाजपच्या मतांची विभागणी होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात तर अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या निर्धार केलेले बिरसा फायटर्सचे  संस्थापक अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे देखील आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात. सुशील कुमार पावरा हे देखील आदिवासी समाजात लोकप्रिय उमेदवार असून त्यांची मतदारावर चांगली पकड आहे. गावागावात त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कार्यरत आहेत. मागील काळात आदिवासींवर झालेला अन्याय, तालुक्यातील सांगवी दंगल, मनिपुर सारख्या घटना आजही आदिवासी बांधव विसरला नाही. या तिन्ही उमेदवारांची आदिवासी मतात विभागणी झाल्याने विजयासाठी आता इतर सर्व समाजांच्या मते मिळवण्यावर उमेदवारांची भर असेल.  त्यामुळे या निवडणुकीत सुशील कुमार पावरा आदिवासींचे गठ्ठा मतदानाला सुरुंग लावून कोणाचे पारडे जड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय  तालुक्यात कोळी समाजाची जाहीर नाराजी आहे. मराठा समाज देखील भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे . क्षत्रिय राजपूत समाजात देखील भाजप विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलने सुरू आहेत.

मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत लोकसभेसाठी शिरपूर तालुक्यातून भाजपच्या उमेदवारास चाळीस ते पन्नास हजारांच्या लीड मिळत होता. आता मात्र परिस्थिती थोडी विपरीत आहे. शिरपूर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत कलह व नाराजीच्या सूर आहे. आमदार अमरीश भाई यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांची राजकीय गोची झाली आहे. मागील पाच वर्षात विद्यमान खासदार यांनी आमदार अमरीश भाई पटेल यांच्या गटाशी जुळून न घेतल्याने त्यांच्यातील विसंगती वारंवार समोर आली होती. एकमेकांच्या कार्यक्रमांना एकमेकांनी पाठ फिरवणे हे या तालुक्यात नित्याचे झाले होते. या राजकीय श्रेय वादाच्या लढाईला मोठी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा आमदार अमरीश भाई पटेल यांनी विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील तालुक्यातील कामांना थांबा दिला. शिवाय ज्या ज्या वेळी डॉक्टर गावित खासदार म्हणून विकास कामांच्या उद्घाटनाला तालुक्यात आले त्या त्या वेळी नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले. अगदी निवडणूक काळात देखील लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या कार्यक्रम आमदारांचा सकाळी तर खासदारांचा दुपारी एकाच दिवशी वेग वेगळा झाला. खासदार हिना ताई गावित यांनी ज्या गावांना विकास कामांचे उद्घाटन केले त्यातील काही गावातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. आणि तुम्ही एक तर माझ्यासोबत राहा किंवा खासदार मॅडम सोबत रहा अशा शब्दात दम दिल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे तालुक्यात भाजपचे दोन गट निर्माण होऊन कार्यकर्ते देखील विभागले गेल्याची चित्र दिसून आले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आदेश म्हणून सर्व काही आलबेल आहे  असे दाखवत दोन गट जरी एकत्र आले असले तरी त्यांची नाराजी पूर्णपणे दूर झाली का याबाबत साशंकता आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील एका पक्षात असून देखील कोणता झेंडा घेऊ हाती अशी विपरीत परिस्थिती आहे. तालुक्यावर भाजप ची एक पक्षीय सत्ता असून देखील यापूर्वी राबवली जात होती तशी प्रचार यंत्रणा राबतांना दिसत नाही. तो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये दिसत नाही. तालुक्याचे आमदार जरी डॉक्टर गावित यांच्यासोबत प्रचारात व्यस्त असले तरी त्यामागे असलेली कार्यकर्त्यांची बिस्त  कुठेतरी गायब असल्याचे दिसत आहे. भाजपच्या प्रचारात कुठेही स्थानिक मुद्द्यांना स्थान दिले गेले नाही. साखर कारखाना बंद आहे, इतर सहकारी प्रकल्प पंचतत्वात विलीन झाले आहेत. युवकांपुढे बेरोजगारी आ वासून उभी आहे.मात्र जर आगामी काळात मतदार कार्यकर्ते यांची साथ मिळाली नाही,आणि लोकांनी आपला राग मतदानातून व्यक्त केला तर मात्र शिरपूर तालुक्यातून यावेळेस भाजप उमेदवार यास कोणतेही मताधिक्य मिळणार नाही असा सूर आहे. आणि असे झाले तर आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यात भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार कोण असेल हे लोकसभेच्या गणितावर अवलंबून आहे . त्यामुळे भाजप चा उमेदवार विजयी झाला आणि लीड मिळाला नाही तरी शिरपूरची आमदारकीची उमेदवारी धोक्यात आहे अशी राजकीय परिस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून 'मिशन 45 प्लस' अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेषत: भाजपने आपल्या आमदारांना खास टार्गेट दिलेले आहे. जो आमदार लोकसभेत टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आले की, जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल त्याला पुन्हा तिकीट देण्यात येईल, आणि ज्याच्या मतदारसंघात लीड कमी मिळेल त्याचे आमदारकीचे तिकीट धोक्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराशी मतभेद असले तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना जुळून घ्यावे लागून पक्षाचे  काम करावे लागणार आहे.

असे असताना राज्यात मिशन 45 प्लस पूर्ण करण्यासाठी एकीकडे हे दिग्गज नेते कामाला लागले असताना दुसरीकडे भाजपने आपल्या आमदारांना देखील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून लीड देणे बंधनकारक केले आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजप नेत्यांनी विधानसभा आमदारांना नुसते टार्गेटच दिले नाही तर त्यानुसार प्रत्येकाचे रिपोर्ट कार्डच तयार केले जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचे मूल्यमापन यावेळी केले जाणार आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहायचे असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागणार आहे.

त्यामुळे शिरपूर तालुक्यातून मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीवर या वर्षाच्या लोकसभेचे विजयाचे गणित अधोरेखित होणार असून कोणाच्या विजय आणि कोणाचा पराजय हे निकाल अंती कळेल. मात्र निवडणूक लोकसभेची आणि राजकीय गणित मात्र विधानसभेचे अशी विचित्र राजकीय परिस्थिती भाजप च्या नेते आणि कार्यकर्त्यांवर येऊन ठेपली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने