शहादा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिवस साजरा
प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा
पत्रकारितेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असले तरी सत्य कोणत्याही परिस्थितीत बाहेर आणणे हे पत्रकाराचे आद्य काम असून नवीन पत्रकार अभ्यासपूर्ण बातमीच्या माध्यमातून मांडणी करीत असल्याचे ॲड. राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.
येथील व्हाॅलंटरी महाविद्यालयाच्या सभागृहात शहादा तालुका पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व पत्रकारांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा. दत्ता वाघ, ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत, शहादा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ॲड. कुलकर्णी म्हणाले की, पत्रकार आणि वकील एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्य कितीही बांधले ते कोणत्याही परिस्थितीत बाहेर येते. सत्याला मांडणे आपला बचाव आहे. सत्य आहे पण पुरावा नाही तर हा सत्याचा अभास निर्माण करणे हा बचाव आहे. पत्रकारांवर हल्ले व्हायचे यावर कायदा झाला परंतु सत्य हा बचाव असू शकतो तसेच सत्याचा आभास निर्माण करणे हा बचाव व्हायला हवा अशी शासनाकडे मागणी करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कायदे बदलतात प्रत्येक गोष्टीला आधार नसतो जे मांडतात त्याला आधार नसतो परंतु जे निर्माण केलेली गोष्ट सिद्ध करण्यासाठी बचाव असला पाहिजे त्यासाठी सत्याचा आभास निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. दत्ता वाघ यांनी सांगितले की, पत्रकार दिवस म्हणजे प्रबोधन दिन आहे. हल्ली पीत पत्रकारिता उसळलेली आहे. समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता सुरू आहे. कै. बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पत्रकाराच्या माध्यमातून समाज जागृती केली. नव्या पिढीतील पत्रकारांनी प्रबोधनाची बाजू उचलून धरत सक्षम लेखणी चालवावी असे आवाहन प्रा. वाघ यांनी केले.
यावेळी संजय राजपूत म्हणाले की, समाज जागृतीचे पत्रकारिता एक साधन आहे. छोट्या बातमीला मोठ्या बातमीचे स्वरूपात प्रकाशित करण्याचे कौशल्य पत्रकारांमध्ये असते नवीन पिढीतील पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली समाज परिवर्तनाची पत्रकारिता करावी असे राजपूत यांनी सांगितले. दरम्यान शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघातील सदस्यांसाठी ओळखपत्र निर्माण केले असून सदर ओळखपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत शिवदे यांनी केले तर आभार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी केले. यावेळी पत्रकार गिरधर मोरे, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बेलदार, सलाउद्दीन लोहार, मनोज बिरारी, धरमसिंग ठाकरे, राजेश्वर सामूद्रे, सुमित गिरासे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डी.सी पाटील, हर्षल साळुंखे, योगेश सावंत, दीपक वाघ प्रा.ए.ए. खान यांनी परिश्रम घेतले.
