लोकसभेतून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे निलंबित
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या ९२ खासदारांच्या निलंबनावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही फक्त संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर सरकारकडून उत्तर आणि सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत होतो.
हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण सरकार त्यापासून पळ काढत आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात गृहमंत्री अमित शहांच्या निवेदनासाठी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर निलंबनास्त्र चालले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गैरवर्तनाचा ठपका ठेवून पिठासीन अधिकाऱ्यांनी आज तब्बल 78 खासदारांना निलंबित केले होते. यामध्ये लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश होता. मागील आठवड्यात दोन्ही सभागृह मिळून 14 खासदार (लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील 1) निलंबित झाले होते. त्यानंतर सोमवारी 78 खासदारांचे निलंबन झाले. अशाप्रकारे विरोधी बाकांवरील तब्बल 92 खासदारांची संसदेतून हिवाळी अधिवेशन समाप्तीपर्यंत गच्छंती झाली आहे.
