जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांचा राजीनामा, तात्पुरता पदभार उपाध्यक्षांकडे
धुळे : धुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची निर्धारित कालमर्यादा संपुष्टात आल्याने खांदेपालट होण्याची प्रतीक्षा भाजपाच्या अंतर्गत गटात होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असून जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी आपल्या पदाच्या राजीनामा दिला आहे.
पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे गुरूवारी दिला. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान पुढील अध्यक्षाची निवड होईपर्यंत उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा भार असणार आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
पक्षांतर्गत अध्यक्षपदाचा कालावधी १३-१३
महिन्यांचा ठरलेला असल्याने, अश्विनी पाटील यांची मुदत १३ नोव्हेंबर २३ रोजी संपुष्टात आलेली होती. मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा न दिल्याने, सत्ताधाऱ्यांमधील एक गट पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सक्रीय झालेला होता. अखेर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर १४ महिन्यानंतर गुरूवारी अश्विनी पाटील यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा स्वखुशीने
देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे गेल्या एक-दीड महिन्यांपासून अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
कोण आहेत संभाव्य अध्यक्ष पदाचे उमेदवार
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पदावर धुळे तालुक्यातील लामकानी गटाच्या धरती निखील देवरे, शिंदखेडा तालुक्यातील विखरण गटाच्या कुसुमबाई कामराज निकम यांची नावे चर्चेत आहे. मात्र अंतिम निर्णय भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर समोर येईल. तोपर्यंत धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिग सुरू असल्याचे बोलले जात आहे.
