*लेख -२५ डिसेंबर : नाताळ/ख्रिसमस*
*ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा*
*हॅपी ख्रिसमस*
✍️लेखक - रणवीर राजपूत,
बंधू भगिनींनो,*नाताळ* अर्थातच *ख्रिसमस* हा ख्रिस्ती लोकांचा एक मुख्य सण असून,तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.हा सण ख्रिश्चन धर्मीयांसाठी महत्वाचा सण म्हणून पाहिले जाते.प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक म्हणजेच प्रवर्तक मानले जातात.सकल
मानवजातीला त्यांनी अहिंसा,मानवप्रेम,शांती व मानवतेची शिकवण दिली.नाताळ हा ख्रिश्चन लोकांसाठी आनंदाचा अन् हर्षोल्हासाचा सण असला तरी या सणात आता इतर धर्मांचे लोक देखील
स्वेच्छेने सामील होऊन ख्रिसमसचा आनंद लुटत असतात.त्यामुळे या सणाची व्याप्ती खऱ्या अर्थानं विस्तृत झाली आहे.तथापि,ख्रिसमस हा सण जणू
ख्रीस्तींसाठी आनंदाची पर्वणीच असते.भारतात विभिन्न धर्मांचे लोक
गुण्यागोविंदाने नांदत आहेत.त्यामुळे साऱ्या देशात *विविधतेत एकता*(Unity in Diversity) असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत असून,भारत हा
*सर्वधर्मसमभाव*
(सिक्युलॅरीझम)चे प्रतिक असल्याचे सिद्धीस येते.
जगात आजच्या घडीला महाशक्ती ह्या लहान देशांना,त्यांच्या प्रदेशांना बळाचा वापर करून गिळंकृत करण्यासाठी अणूशस्त्रांचा वापर करत आहेत.त्यामुळे जागतिक पातळीवर सर्वत्र अशांतता व अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमीवर सर्वांनी वर्तमान अन् भावी काळात कायमस्वरूपी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांती,अहिंसा अन् मानवतेच्या शिकवणीचा अंगिकार करण्याची नितांत गरज आहे.त्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही,हे स्पष्ट दिसते.एकमेकांचा भूप्रदेश युद्धाच्या मार्गाने हडप करण्यासाठी हजारों निरपराध नागरिकांचा नाहक बळी दिला जाताहे,ही लांच्छनास्पद गोष्ट आहे.या सर्व अपप्रकारांवर पायबंद घालण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे विचार साऱ्या
मानवजातीने अंगिकारावेत, म्हणजे हीच खरी येशुंना मानवंदना ठरेल.
नाताळ हा सण २५ डिसेंबरला असला तरी ख्रिस्ती लोक या सणाची तयारी १० दिवस अगोदरपासूनच सुरू करतात.या काळात त्यांच्या घरी गोड पदार्थ बनविण्याची कामे सुरू होतात. त्याप्रमाणेच नवनवीन कपडे,नवीन वस्तू खरेदी करण्याची लगबग सुरू होते.नाताळ सणाचा आनंद नातेवाईक अन् मित्रमंडळीसोबत साजरा करताना ख्रिस्ती बांधव हे वाईन,फळेमिश्रित नाताळ केक,भाजलेली टर्की, पुडींग,चॉकलेटचे विविध प्रकार,बिस्किटे,बटाट्याच्या चिप्स,अंड्याचे-मासाहारचे विभिन्न पदार्थ भोजनासाठी तयार करून ख्रिसमसची मजा लुटतात.ईसाई धर्माच्या धार्मिक मान्यतेनुसार येशू ख्रिस्त मसिह यांचा जन्म २५ डिसेंबरला झाला होता,या पार्श्वभूमीवर हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.
सन ३६० ईसवीला रोमच्या चर्चमध्ये पहिल्या वेळेस ईसा मसिहचा जन्म दिवस साजरा केला गेला.येशूची आई मारिया अन् वडील जोसेफ यांचा पुत्र येशू मसिहचा जन्म बेथलेहेम येथे झाल्याचे *बायबल* या ख्रिस्ती लोकांच्या धर्मग्रंथात नमूद केलं आहे.ख्रिश्चन लोकांच्या श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या *ख्रिसमस्टाईड* नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी हे एकमेकांना भेटून परस्परांना *नाताळ शुभेच्छापत्र* अन् भेटवस्तू देत असतात अन् गळाभेट घेऊन शुभेच्छा व्यक्त करतात.याशिवाय ख्रिसमसला ख्रिस्तीधर्मीय हे आपल्या घरांना तसेच अवतीभोवतीच्या परिसराला रंगबिरंगी रोषणाई करून सजवित असतात.तथा सकाळच्या प्रहरी चर्चमध्ये सहकुटुंब जाऊन आपल्या परिवारासाठी अन् सकल मानवजातीला आनंदमय जीवन व सुख-शांती लाभावी,यासाठी प्रभू येशूला प्रार्थना(प्रे) करतात. याशिवाय ख्रिसमसला चर्चमध्ये जाऊन शाळेकरी मुलं-मुली विभिन्न
वाद्यवृंदांचा वापर करून सामूहिकरित्या *नाताळ गीते(कॅरोल्स)* गातात. या गीतांना *नोएल* असेही संबोधिले जाते.*नाताळ केक* हे ख्रिसमसचे मोठे आकर्षण असून, त्यावर *मेरी ख्रिसमस* असे नमूद केले जाते.त्याचा सर्वांना आस्वाद मिळतो.महत्वाचे म्हणजे सदर दिवशी
सरकारकडून देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असते.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे *ख्रिसमस ट्री* हा नाताळ सणाचा एक अविभाज्य घटक असून,तो विविध वस्तुंनी,रंगबिरंगी रोषणाईने सजविला जातो.इतकेच नव्हे तर,*सांताक्लॉज* ही एक काल्पनिक व्यक्तीरेखा असून,त्याला मराठीत
*नाताळबाबा* असेही म्हणतात.त्याच्याजवळ भेट वस्तूंची,चॉकलेट,केकने भरलेली मोठी पिशवी असते.रात्रीच्या प्रहरी
सांताक्लॉज हा गल्लोगल्ली फिरत लहान मुलांना भेटून त्यांना *हॅपी ख्रिसमस* अशा शुभेच्छा व्यक्त करत भेटवस्तू देतो.याप्रसंगी *मेरी ख्रिसमस अँड ए हॅपी न्यू इयर* हा नाताळ शुभेच्छा संदेश जागोजागी प्रसारित केला जातो.
विशेष बाब म्हणजे बायबल ग्रंथात येशू ख्रिस्त यांना मरियम पुत्र,परमेश्वराचा पुत्र,प्रभू येशू,ख्रिस्त,जिझस क्राईस्ट,ईसा मसिह या नावांनी संबोधले गेले आहे.पहिले पोप लिबेरिअस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ या वर्षादरम्यान जगातील समस्त ख्रिस्ती धर्मियांसाठी २५ डिसेंबर हा येशूचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.येशू ख्रिस्तच्या जन्मापासूनच्या वर्षाला ॲनो डोमिनी(A.D.)म्हणजेच *प्रभूचे वर्ष* असं म्हणण्याचा प्रघात पडल्याचे सांगण्यात येते.अत: ख्रिश्चन बंधू-भगिनी तथा विद्यार्थी मित्रांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!मेरी ख्रिसमस!
✍️लेखक - रणवीर राजपूत,
गव्हर्नमेंट मिडिया,महाराष्ट्र शासन(मो.न.9920674219)
Tags
news
