कोठली येथील उपोषणकर्त्यांची गटविकास अधिकारी यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ.
कोठली ता.शहादा येथील ग्रामपंचायतीत तीन वर्षात प्राप्त झालेल्या शासननिधीच्या खर्चाची तसेच वसुली करण्यात आलेल्या घरपट्टी पाणीपट्टी रकमेतील अपहाराची चौकशी करून सरपंच,ग्रामसेवक व सरपंचपुत्र असलेल्या ग्रा. प.सदस्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी कोठली येथील जिजाबराव यशवंत पाटील व अरुण भीमराव पाटील हे शहादा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
कोठली येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात तीन वर्षात एकही ग्रामसभा न घेता बेकायदेशिर निधी खर्च करणे,सरपंचपुत्र असलेल्या ग्रा.प सदस्याने जुन्या करवसुली पावत्याद्वारे स्वतःची स्वाक्षरी करून घरपट्टी पाणीपट्टी वसुली करणे,ग्रामपंचायतीच्या विविध बँक खात्यातून कुठलेही विकासकाम न करता गावातीलच खाजगी काम करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठमोठ्या शासकीय रक्कमा हस्तांतर करून अपहार करणे,माहिती अधिकारात माहिती मागितली असता माहिती न देणे असे विविध आरोप करण्यात आले आहेत.
शहादा येथे पंचायत समिती समोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवशम्हणजे रविवार असताना देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे,सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील कोठली ग्रामसेविका योगिता निकम यांनी उपोषण कर्त्याशी चर्चा करून खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चा निष्फळ ठरली.उपोषण कर्तांची भूमिका अशी आहे की जोपर्यंत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी भूमिका ठाम असल्याने एकूणच झालेली चर्चा निष्फळ झाल्याने तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच आहे.
