डॉ.भक्कड युवा संशोधन पुरस्काराने सन्मानित
शिरपूर, येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील आयक्यूएसी समन्वयक व वाणिज्य विभागप्रमुख डॉ.दिनेश भक्कड यांना नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील युवा संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्यामार्फत दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील संशोधकांना युवा संशोधन पुरस्कार देण्यात येतात. डॉ.भक्कड यांच्या १४ वर्षाच्या सेवाकाळात एकूण ४५ शोध निबंध प्रकाशित झाले, त्यांनी ३२ पुस्तकांचे लेखक म्हणून कार्य केले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या देशात संशोधन सादरीकरण, दोन राष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्प पूर्ण केले तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १२ विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. संशोधन क्षेत्रात अशी भरीव कामगिरी पाहता आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन संस्था मुबंई द्वारा नंदुरबार येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध मान्यवरांच्या हस्ते युवा संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा.सुरेखा पालवे, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल डोंगरे, मानव विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.पैठणे, अक्कलकुवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील, आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ.जितेंद्र बागुल, सह समन्वयक डॉ.गांगुर्डे तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकूण २०० संशोधक व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.दिनेश भक्कड यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांतजी रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, माजी प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, प्राचार्य व अधिष्ठाता डॉ. एस. एस. राजपूत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर बंधू-भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
