*रावण दहन केल्यास राम दहन करू-बिरसा फायटर्स*
*रावण दहन प्रथा बंद करा-बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा : गोंड समाजातील महात्मा रावण (रावेन) दहन प्रथा बंद करा व रावण दहन करणा-यांवर ॲट्रासिटी अंतर्गत IPC ची धारा १५३(अ) २९५,२९५(अ) आणि २९८ अनुच्छेद नुसार कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदूरबार व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांनाही पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,वडगाव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण, बिरबल पावरा,राहुल रावताळे, शांतीलाल रावताळे, लक्ष्मण तडवी आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.
रामापेक्षा आमचा राजा रावण कितीतरी पटीने श्रेष्ठ होता.रावणात जेवढे गुण होते तेवढे गुण रामात सुद्धा नव्हते.महात्मा,महानायक,शूरवीर, संगिततज्ञ, राजनितीतज्ञ, नगररचनाकार, शिल्पकार, दानवीर,साहित्यिक,शिवभक्त, न्यायप्रिय असा आमचा राजा रावण सर्वगुण संपन्न होता.सनातनी लोकांनी राजा रावणाला दहा तोंडी राक्षस, खलनायक अशी उपमा देऊन रावणाबद्धल कुप्रचार केला.राजा नायक असूनही त्याला खलनायक बनवले.रावणाची बहिण शूर्पणखा हिचे नाक लक्षमणने कापले म्हणून रावणाने बदला घेण्यासाठी सीतामातेचे अपहरण केले,अशी कथा आहे.रक्षाबंधनाच्या दिवशी आजही काही भागात आदिवासी भगिनी रावणाच्या प्रतिमेला व मूर्तीला राखी बांधतात. रावणासारखा भाऊ शोधून सापडणार नाही.
दक्षिण भारतात तामिळनाडूत राजा रावणाची ३५२ मंदिरे आहेत. झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्रातील मेळघाट मध्ये राजा रावणाची आदिवासी बांधव पूजा करतात. राजा रावण आमच्या आदिवासी समाजासाठी पूजनीय आहे,आदिवासींचे अस्तित्व, प्रेरणास्थान, आदर्श आहे.राजा रावणाचे आदिवासींशी नाते आहे.उलट रामाने सितामाताला गरोदर असताना जंगलात सोडून दिले.सितामाताला अग्निपरीक्षा द्यायला लावली,आगीवर चालायला लावले.म्हणून रामाला आग लावा,रावणाला नको.रावण दहन प्रथा बंद न केल्यास, जिथे जिथे रावण दहन केले जाते तिथे आम्ही राम दहन करू.असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.
