धुळे जिल्ह्यातील खलाणे शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे दूरदृश्य प्रणाली द्वारे ग्राम विकास मंत्री यांचे हस्ते उद्घाटन. दोडाईचा (अख्तर शाह)



धुळे जिल्ह्यातील खलाणे शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे दूरदृश्य प्रणाली द्वारे ग्राम विकास मंत्री यांचे हस्ते उद्घाटन.

दोडाईचा (अख्तर शाह) 

धुळे दि. 4 ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) मार्फत आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा- 2 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील एकूण सहा जिल्हा परिषद शाळांची मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा अभियान परिषदे मधून निवड करण्यात आली होती. सदर आदर्श शाळा विकास कार्यक्रम  टप्पा -2 श्री गणेश मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) तथा नोडल अधिकारी व्हिएसटीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्यामध्ये जिल्हा परिषद सर्वांग सुंदर शाळा खलाणे ता. शिंदखेडा या शाळेचा समावेश आहे.  
ग्राम विकास विभागांतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) च्या वतीने आज (ता. 4 ऑक्टोबर 2023) मुंबई सहयाद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यातील कार्पोरेट कंपन्यांची सी.एस.आर. परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा खलाणे येथील डिजिटल क्लासरूमचे दूरदृश्य प्रणाली द्वारे मा. ग्राम विकास मंत्री श्री गिरीश महाजन यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले, व्हिएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते. तर सी.एस.आर.परिषदेमध्ये जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, एसटीएल, इन्फोसीस, माझगांव डॉक शिपबिल्डर्स लि., सिध्दीविनायक ट्रस्ट, राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स, ॲक्सीस बँक, रोबोटीक्स इंडिया, मॅरीको आदी प्रमुख कंपन्यांसह अनेक कंपन्याचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते, आणि धुळे जिल्ह्यातून श्री विशाल नागनाथवार जिल्हा कार्यकारी (VSTF), श्री चंद्रकांत डिगराळे मुख्याध्यापक जि.प.सर्वांग सुंदर शाळा खलाणे, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक व शिक्षिका जिल्हा परिषद सर्वांग सुंदर शाळा खलाणे आदी ऑनलाईन माध्यामतून उपस्थित होते.
डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पूर्ण झाल्यानंतर श्री चंद्रकांत डिगराळे मुख्याध्यापक जि. प. सर्वांग सुंदर शाळा खलाणे यांनी आदर्श शाळा विकास कार्यक्रमामधून करण्यात आलेल्या पाच विविध घटकांवरील कामाचे जसे भौतिक सुविधा विकास, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, आरोग्य आणि पोषण, आनंददायी शिक्षण, पर्यावरण स्नेही शाळा, विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मागर्दशनाचे काम इत्यादी बाबीचा उल्लेख केला, तसेच यावेळी बोलत असताना मुख्याध्यापक यांनी शाळेत आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या परिवर्तनाचा, विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या गुणवत्तेचा, आणि ह्या आदर्श शाळा विकास कार्यक्रमामुळे लोकांनी शाळेला दिलेल्या लोकसहभाग निधीचा, शाळेच्या वाढत्या पटसंख्येचा, जिल्हा स्तरावरून अधिकारी वेळोवेळी आपल्या शाळेला भेटी देत असल्याचा व मार्गदर्शन करत असल्याचा आणि त्यांमधून शाळेला शासकीय कृतीसंगमातून मिळालेल्या नवीन चार वर्गखोल्यांच्या मंजुरीचा देखील उल्लेख करून त्याबाबतची सर्व माहिती मा. ग्राम विकास मंत्री यांना दिली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री चंद्रकांत डिगराळे म्हणाले जर असाच आदर्श शाळा विकासाचा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यात राबवला गेला तर पालकांचा खाजगी इंग्रजी माध्यमाकडे आपल्या पाल्यांना शिकवण्याचा कल कमी होईल व जिल्ह्यातील सर्वच शाळा ह्या आदर्श शाळा होतील असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले 
त्यानंतर खलाणे येथील इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांनी देखील मा. ग्रामविकास मंत्री महोदय यांचे सोबत संवाद साधला व त्यांना या VSTF मार्फत राबवण्यात येणाऱ्या आदर्श शाळा विकास कार्यक्रमाचा झालेला फायदा आणि त्यांना प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, संगणक या डिजिटल उपकरनामुळे अभ्यासाविषयी, शाळेविषयी लागलेल्या ओढी बाबत त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 
यावेळी मा. मंत्री गिरीश महाजन यांनी शाळांमध्ये व्हिएसटीएफ च्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच खलाणे येथील डिजिटल क्लासरूम चे कौतुक केले. व व्हिएसटीएफ मार्फत राज्यात आदर्श शाळांची निर्मिती करणार असे प्रतिपादन केले, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (VSTF) मार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांना तसेच सीएसआर मार्फत विविध गावांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांना शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करणार आश्वासन दिले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने