लेख* : *५ सप्टेंबर* - *शिक्षक दिन*
*शिक्षक - विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा शिल्पकार*
मित्रहो,मानवी जीवनात आई-वडिलांनंतर शिक्षकाचं स्थान महत्वाचं असतं.देशाच्या भावी पिढीचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शिक्षक आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करत असतो.आज जगात कुठलीही मोठी व्यक्ती मग ती डॉक्टर,इंजिनियर,शास्त्रज्ञ,
समाजसेवक,
सनदी अधिकारी,लेखक वा पोलीस अधिकारी असो,या सर्वांना शैक्षणिक जीवनात सर्वप्रथम घडविले असेल तर ते शिक्षकानेच.शिस्त,शुद्ध विचार,चारित्र्य संपन्नता, सहनशिलता व सदाचार या पंचसूत्रांची शिकवण भावी पिढीला शालेय जीवनात खऱ्या अर्थानं शिक्षकच देतो,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.या पार्श्वभूमीवर कृतज्ञतेच्या भावनेतून सकल विद्यार्थीगण हे आजच्या पवित्र दिवशी शिक्षकांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना गुलाबपुष्प,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करत,त्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतात.अशा पद्धतीने हा महान दिवस देशभर साजरा केला जातो.
आदर्श शिक्षक कसा असावा,तर तो डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,धोंडो केशव कर्वे,रवींद्रनाथ टागोर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साने गुरुजी यांच्यासारखा
सर्वगुणसंपन्न असावा. स्वातंत्र्यपूर्व काळात या थोर विभूतींनी देशातील गोरगरीब,गरजू,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मागास जनजातींतील
मुलां-मुलींसाठी शिक्षणाची कवाडं उघडी करून घरा-घरात ज्ञानगंगा पोहोचवली.या महान गुरुजनांना आम्ही सर्वजण आजच्या मंगलमय दिनी भावपूर्ण अभिवादन करतो.
बंधू-भगिनींनो,राष्ट्रशिक्षक व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात *शिक्षक दिन* म्हणून साजरा केला जातो.डॉ.राधाकृष्णन हे प्रारंभी शिक्षक म्हणून
कार्यरत होते.ते पुढे जाऊन आपल्या कार्यकर्तुत्वाने
*राष्ट्रपती* या सर्वोच्च पदावर विराजमान झाले,ही गोष्ट अखिल भारतीय शिक्षक समुहासाठी अभिमानास्पद आहे.डॉ.राधाकृष्णन यांनी शिक्षक या नात्याने जनमानसात *शिक्षण* या पवित्र क्षेत्राची महती वृद्धिंगत करून,*शिक्षक* या घटकाची मानवी जीवनाच्या जडणघडणीतली उपयुक्तता विषद केली.इतकेच नव्हे तर,आदर्श समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भूमिका किती महत्वपूर्ण असते,हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविले.याशिवाय त्यांनी शिक्षकाला समाजात मानाचे स्थान मिळवून दिलं.या सर्व गोष्टींच्या आधारावर डॉ.राधाकृष्णन यांना देशात *राष्ट्रशिक्षक* म्हणून संबोधिले जाते.शिक्षण व तत्वज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना *भारतरत्न* हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले.*डॉ.राधाकृष्णन यांची आधुनिक विचारवंतांमध्ये पूर्व अन् पश्चिम भारताला जोडणारा दुवा*,अशी ओळख आहे.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षक दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन!
*दर्जेदार शिक्षण देणारा देश अशी भारताची जगात प्रतिमा असावी,हे डॉ.राधाकृष्णन यांचे स्वप्न होते*. हे स्वप्न खऱ्या अर्थानं साकार केलं ते महाराष्ट्राच्या एका अध्यापकाने, त्याचं नाव आहे... *श्री रणजितसिंह*
*डिसले*. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं. माहिती तंत्रज्ञान युगाच्या पार्श्वभूमीवर खासकरून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना *क्यू आर कोड* द्वारे माहिती उपलब्ध करून देऊन आय टी तसेच इंग्रजीत संभाषण करणे आदी तत्सम बाबींशी सलग्न असलेल्या शैक्षणिक प्रकल्पाच्या निर्मितीबद्दल रणजितसिंह
डिसले यांना *ग्लोबल टीचर अवॉर्ड* बहाल करून सन्मानित करण्यात आले. सदर वैश्विक पुरस्कार युनेस्को एवं लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे देण्यात आला. *रणजितसिंह डिसले हे हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक आहेत*.त्यांचे समस्त
मराठीजनांतर्फे अभिनंदन अन् त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! त्यांच्या क्यू आर कोडचा सध्या जगातील १२ देशांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रयोग होताहे.डिसले यांनी आपल्या ७.३८ कोटी रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेतून अर्धी रक्कम अन्य ९ स्पर्धकांना वाटून देण्याचे घोषित करून,भारतीय शिक्षकाचं मन किती मोठं असतं,हे त्यांनी साऱ्या जगातला कृतीने दाखवून दिलं.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेली रक्कम *सोशल कॉज* करिता वापर करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.याबद्दल त्यांचे मी तमाम विद्यार्थ्यांतर्फे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.अंतत: शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना एवं विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा तर, गुरुजनांना विनम्र वंदन!
*लेखक - रणवीरसिंह राजपूत*
*ठाणे/नंदुरबार*
*निवृत्त प्रसिद्धी अधिकारी, मंत्रालय*
मो.न.९९२०६७४२१९
