शिरपूर : श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. येथील मुकेश आर. पटेल सैनिकी विद्यालयातील मधुराम महेश सोनवणे याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी स्तुत्य निवड झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
शासकिय जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे दि. १४ जानेवारी २०२३ रोजी शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत मधुराम महेश सोनवणे याने सुवर्णपदक पटकावले. या शालेय नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षे आतील वयोगटात ६६-७० वजनी गटात मधुराम महेश सोनवणे याने नाशिकच्या खेळाडूचा अंतिम सामन्यात पराजय करून सुवर्णपदक पटकावले. तसेच मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूलच्या ५२-५३ वजनी गटात जयेश पाटील, ५७-६० वजनी गटात भूषण बारी यांनी रौप्य पदक प्राप्त केले. तसेच दि. ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ दरम्यान चंद्रपूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मधुराम महेश सोनवणे याची निवड झाली.
विजयी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शालेय संचालिका गिरिजा मोहन, शाळेचे प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी कौतुक केले.
क्रीडा समन्वयिका ज्योत्स्ना जाधव, क्रीडा शिक्षक डी. बी. माळी, बॉक्सिंग कोच धीरज पाटील व नेहा कासार यांचे मार्गदर्शन लाभले.
.jpg)