कल्याण- दि. २४ जाने.
समाजमनात समाजहिताची व जनकल्याणाची भावना वृद्धिंगत व्हावी. या भावनेतून प्रत्येक कृती घडावी. त्या कृतीतून आदर्श, संवेदनशील व सजग समाज निर्मिती व्हावी. अशा सुदृढ समाजाची देश व राज्य पातळीवरील वाटचाल सुराज्य निर्मितीच्या दिशेने व्हावी. या हेतुने, सुराज्य निर्माण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आल्याचे मनोगत समाजसेवक सुराज कुटे यांनी व्यक्त केले. उल्हासनगर येथील संविधान चौकातील साईबाबा मंदीर परीसरात सुराज कुटे यांच्या जन्मदिनानिमित्त नुकताच स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते सुराज्य निर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक शिवाजी रगडे, श्रीमती जयश्री रगडे, समाजसेविका श्रीमती साधना सुरेश कुटे, सुराज्य निर्माण प्रतिष्ठानचे सचिव व समाजसेवक गणराज मधु, नगरसेवक गजानन शेळके, ज्येष्ठ नेते जमील खान, एकता मित्र मंडळाचे विशाल भोसले यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण मानवसृष्टीच्या कल्याणाचा वसा हाती घेतलेल्या, सुराज्य निर्माण प्रतिष्ठानरुपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होवो. त्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असून, भविष्यात सर्वांनी मिळून एक दिलाने समाजकार्यात या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलावा व त्यामाध्यमातून समाजाच्या ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न करावा.असे आवाहन, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी यावेळी केले.
सुराज्य निर्माण प्रतिष्ठानच्या स्थापने निमित्ताने परिसरातील नागरिकांना १११ तुळशीची रोपे वाटप करण्यात आली. अखिल मानव जातीच्या निरोगी व मंगलमय आयुष्यासाठी यावेळी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. या रोपांचे वाटप करण्यामागील उद्देश व्यापक स्वरुपाचा असुन निरोगी मानवी आयुष्याशी जुळलेला आहे. असा संदेश संस्थेच्या माध्यमातून देण्यात आला.
संस्थेच्या स्थापनेमागील हेतू गणराज मधु यांनी प्रास्ताविकात सांगितला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री रगडे, साऊल गावित, शीलाताई बसोळे, सिद्धेश सावंत, परिसरातील संपूर्ण नागरिक, तरुण व महिलांनी अथक परिश्रम घेतले.
