२३ जानेवारी - बाळासाहेब ठाकरे जयंती बाळासाहेब ठाकरे-- मराठी माणसाची बुलंद आवाज लेखक ✍️रणवीर राजपूत,ठाणे गवर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन(निवृत्त प्रसिद्धी अधिकारी,मंत्रालय)

 




शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे महा..राष्ट्राचा पुरुषार्थ! बाळासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरं नाव!  बाळासाहेब म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज! उसळलेल्या राजकीय तुफानाला रोकण्याची किमया त्यांच्या अंगी होती.म्हणूनच ते भगव्या तुफानाचे सारथी होऊ शकले.शिवसेनाप्रमुख आज जरी आपल्यात नसले,तरी त्यांचे परखड व जहाल विचार आमच्या रक्तात  भिनले आहेत अन् तेच आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहेत.त्यामुळे त्यांचे स्थान आमच्या हृदयात ध्रुवतारा सारखे अढळ आहे.बाळासाहेबांनी शिवसैनिकांची जात,धर्म,पंत, भाषा न पहाता,त्यांच्या कर्तबगारी व निष्ठेवर त्यांना पक्षात महत्वाची पद दिली. तात्पर्य,बाळासाहेबांनी संघटना बांधणी करताना निष्ठा व कार्यकर्तुत्वावर अधिक भर दिला,हे राज्यासह देशातील लोक जाणून आहेत.तात्पर्य,बाळासाहेब हे मानवतावादी तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.  

वास्तविक पहाता,तब्बल अर्ध शतक मराठी जनमानसावर  अधिराज्य करणारी बाळासाहेबांची शिवसेना ही देशात केवळ एकमेव संघटना आहे.बाळासाहेबांसारखे लोकनायक हे सदैव आपल्या विचाराने जिवंत असतात अन् ते समाजालाही जिवंत ठेवतात.वास्तवात बाळासाहेबांनी शिवसैनिकांवर विश्वास ठेवला,तर शिवसैनिकांनी बाळासाहेबांना विश्वास दिला.म्हणूनच आम्ही म्हणतो,एकच साहेब.. बाळासाहेब! खरं तर, शिवसैनिक हे  बाळासाहेबांची जणू कवचकुंडलेच.मराठी माणसावर भगवा विश्वास असणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली व त्रिवार मानाचा मुजरा!💐🙏


वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या ठाकरे घराण्यात झाला,अन् जणू काही हिंदुत्वाचा आधारवड उदयास आला.वंदनीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या समाज प्रबोधनाच्या विचारांची कास धरून बाळासाहेबांनी अंधश्रद्धा व जातीभेदाला प्रखर विरोध केला.महाराष्ट्रातील मागास जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव दिला.बाळासाहेबांनी शिवसैनिकांची योग्यता व निष्ठा परखून त्यांना नगरसेवक,महापौर,

संघटनेतील महत्वाची पदे,मंत्री,मुख्यमंत्री आदी महत्वपूर्ण पदे बहाल केलीत.यावरून बाळासाहेब हे पुरोगामी व मानवतावादी विचारसरणीचे लोकनेते होते,हे निष्पन्न होते.


बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभावाचा अंगिकार करून सर्व जाती धर्मातील तरुणांना शिवसेनेत मानाचं स्थान दिलं.शिवसेना नेते स्व.शाबीर शेख तर त्यांचे सर्वाधिक आवडते शिवसैनिक होते. सिनेअभिनेता दिलीपकुमार यांचे जिवलग मित्र तर,प्रख्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ते भगिनी मानत.महानायक अमिताभ बच्चन हे तर त्यांना पितासमान मानत.याशिवाय विविध पक्षांचे नेते उदा.इंदिरा गांधी,अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी वसंतराव नाईक,शरद पवार,सुशीलकुमार शिंदे,विलासराव देशमुख,प्रमोद महाजन,

सुनिल दत्त,गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.राजकारण अन् मैत्री ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत,हे त्यांनी कृतीने सिद्ध केलं.आचार्य अत्रे,पु.ल.देशपांडे या साहित्यिकांशी त्यांचे तात्विक मतभेद होते,पण त्यांनी मित्रत्वाचं नातही जपलं होतं.पक्षाभिनिवेश बाजूला सारून बाळासाहेबांनी सौ.प्रतिभाताई पाटील आणि मा.प्रवण मुकर्जी यांना शिवसेनेतर्फे राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला.भारतातील लोकांना शिस्त लागावी अन् देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी,या उद्देशाने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीचे बाळासाहेबांनी समर्थन केलं.ह्या सर्व बाबी विचारात घेतल्या तर, बाळासाहेबांची विचारधारा ही सर्वसमावेशक होती,हे निष्पन्न होते.


काही माणसं ताडामाडा प्रमाणे उंच वाढून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात.पण बोटावर मोजण्याइतकीच माणसं वटवृक्षाप्रमाणे वाढून दुसऱ्यांना सावली देतात.ते वटवृक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करारी बाण्यामुळे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत केली नाही.आतंकवादी संघटनादेखील त्यांना दचकत असतं,एवढा त्यांचा दरारा होता.मंत्रालयात सत्ता असो वा नसो,बाळासाहेबांचा शब्द तेथे प्रमाणित मानला जात असे.संयुक्त महाराष्ट्र लढा असो वा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो,

त्यांनी सदैव मराठी भूमीपुत्रांचा बुलंद आवाज बनून,शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रखर लढा दिला.आजही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून शिवसैनिकांनी हा लढा अविरत सुरू ठेवला आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक महाराष्ट्रप्रेमी आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले.त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञतेच्या भावनेतून बाळासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातिर्थी पडलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे उभारून त्यांना खरी मानवंदना दिली.


बाळासाहेबांना राजकारण,संगीत, कला,नाट्य,चित्रपट,लेखक,संपादक,जहाल वक्ता अन् व्यंगचित्रकार,निसर्ग व पक्षी प्रेमी असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलं होतं.त्यामुळेच बाळासाहेबांची जनमानसात मोठी ख्याती होती अन् आजही आहे.कारण शिवरायांच्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात त्यांना मानाचं स्थान आहे.पण या मागे एक तेजस्वी प्रेरणा होती,ती म्हणजे स्व.मिनाताई ठाकरे.आयुष्यभर त्या त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या.तसेच त्यांच्या सुखदुःखात बरोबरीच्या वाटेकरी होत्या.इतकेच नव्हे तर,आपल्या मुलांवर जेवढं प्रेम केलं,तेवढंच त्यांनी शिवसैनिकांवरदेखील केलं. मुलांमध्ये अन् शिवसैनिकांमध्ये त्यांनी कधीच दूजाभाव केला नाही.त्या खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या माता होत्या.म्हणूनच सर्वच जण त्यांना मांसाहेब मिनाताई असे संबोधित असत.यास्तव आम्ही तमाम शिवसैनिक वंदनीय बाळासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करतो.


प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करणं,पक्षी-प्राण्यांवर अतूट प्रेम करणं,निसर्गाचा आस्वाद घेणं,गडकिल्ले भ्रमण करणं,नेते-अभिनेते यांच्या हुबेहूब नकला करणं अन् मुख्यतः राजनेत्यांचे व्यंगचित्रे रेखाटणं हे बाळासाहेबांचे आवडते छंद होते. राष्ट्रीयपातळीवर त्यांची ख्यातनाम व्यंगचित्रकार म्हणून जनमानसात ओळख होती.इतकेच नव्हे तर,बाळासाहेब जे उत्कृष्ट नकलाकार देखील होते.त्यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते अन् त्याला अभ्यासाची जोड होती.पत्रकारिता हे एक व्रत आहे,अशी त्यांची धारणा होती.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दरवर्षी त्यांचे विजयादशमीला होणारे शिवाजी पार्क येथील जहालवादी भाषण ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त न चुकता तेथे येत असतं.कारण ते ऐकल्याशिवाय चाहत्यांना  विजयादशमी साजरी केल्यासारखं वाटत नसे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर,देशात त्यांच्यासारखा जहाल, परखड असा चतुरस्त्र वक्ता पुन्हा होणे नाही.


पत्रकारांना उद्देशून बाळासाहेब म्हणतात,आपले नाव व्हावे,या हेतूने कृपया कोणी *पत्रकारिता करू नये सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपापली लेखणी सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी चालवा. जनजागृती व लोकशिक्षण हेच खरे पत्रकारितेचे दोन स्तंभ आहेत,असा संदेश त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील सदस्यांना दिला.व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे स्थान अढळ होते.बाळासाहेब हे उच्च कोटीचे मार्मिक  व्यंगचित्रकार होते. फटकारे हे व्यंगचित्रांचे पुस्तक पाहून तर माणसं अक्षरशः थक्कच व्हायची.सर्वसामान्य लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून,सरकारला ते प्रश्न सोडविण्यास भाग पाडण्यासाठी सामना या मुखपत्रात त्यांची लेखणी ही चार दशके तलवारीसारखी चालली.याशिवाय बाळासाहेबांना पुस्तकांप्रमाणेच माणसं वाचणं हा त्यांचा छंद होता. तात्पर्य,बाळासाहेब ठाकरे हे पत्रकारितेचे चालते बोलते विद्यापीठच होते.मराठी माणसाच्या अस्मितेचे जतन,संवर्धन व रक्षण करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना या मराठमोळ्या संघटनेची स्थापना केली.तेव्हापासून मराठी माणसाला न्याय मिळत आला आहे,याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो अन् अभिमानही वाटतो.


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मा.शिवसेनाप्रमुखांच्या महानतेविषयी म्हणतात,"वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे होते,त्यांनी लहान-मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांवर प्रेम केलं.महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना अन् देशातील हिंदूंना ताठ मानेनं जगण्याची शिकवण दिली.आमच्यासारख्या सामान्य माणसांदेखील त्यांनी जबाबदाऱ्या देऊन घडविलं.राजकारणातून समाजकारण करण्याचा धडा दिला.महत्वाचे म्हणजे  बाळासाहेबांच्या आशिर्वादानेच आम्ही घडलो.तर त्यांच्या कुचल्यां-व्यंगचित्रातून,लेखनातून अन् हिंदुत्वाच्या जहाल विचारातून शिवसेना ताट मानेनं उभी ठाकली,कारण ती बाळासाहेबांनी घडविली". 


बाळासाहेबांनी राज्यातील मागास जाती-जमातीतील युवकांना शिवसेनेकडे आकृष्ट करून त्यांना घडविले.अन् त्यांना महत्वाची पदे देऊन त्यांच्या हाती हिंदुत्वाचा झेंडा दिला.पुढे याच शिवसैनिकांनी निष्ठापूर्वक व हिमतीने मुंबईत ज्या ज्या वेळी अतिवृष्टी,बॉम्बस्फोटसारखी संकटे आलीत,त्या त्या वेळी मदतीला हात देत लोकांना संकटमुक्त करून दिलासा दिला. शिवसैनिक हा आधी करून दाखवतो,नंतर बोलतो हा बाळासाहेबांचा विचार प्रत्येक शिवसैनिकाने आत्मसात करून त्याअनुषंगाने ते आजही कृती करत आहेत.त्यामुळेच शिवसेना गेल्या पाच दशकांहून अधिक काळ स्वबळावर आगेकूच करत आहे.विशेष सांगायचे झाले म्हणजे किती आलेत अन् किती गेलेत,पण शिवसेना ही शिवरायांच्या महाराष्ट्रात  वटवृक्षासारखी ताट मानेनं मजबूत उभी आहे.हिंदुत्वाची भगवी कास धरून बाळासाहेबांचा निष्ठावान व जाबांज असा ठाण्याचा शिवसैनिक एकनाथजी शिंदे यांच्या हातात महाराष्ट्राची धुरा आली असून,बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसेना-बीजेपी युतीचे सरकार राज्यात विराजमान झालं,याचा मराठी जनमानसाला सार्थ अभिमान वाटतो.


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राज्यातील अनेक जिल्ह्यांना,हजारो खेड्यांना अन् आसपासच्या राज्यांना जोडणारा समृद्धी महामार्ग मार्गी लागला असून,त्याचं नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं आहे.या महामार्गामुळे दळणवळणमध्ये सुलभता येऊन दैनंदिन जीवनात लाखों लोकांचा वेळ व पैसा वाचून त्यांची वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होणार आहे.त्यासह मुंबई महापालिकेंतर्गत निर्माण झालेले 

२० नव्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले.याशिवाय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेकडों 

महाआरोग्य शिबिरे  आयोजित करून असंख्य गोरगरीब,गरजू लोकांची मोफत आरोग्य तपासणी झाली.इतकेच नव्हे तर,असंख्य निर्धन लोकांचे महागडे ऑपरेशन्स मोफत करण्यात येऊन त्यांना 

नवजीवन प्राप्त झालं. सुमारे चार हजाराहून अधिक लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्राची मोफत शस्त्रक्रिया होऊन,त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.खरं तर,यापेक्षा मोठं पुण्यकर्म नाही.महाराष्ट्रात कोठेही कोरोना असो नैसर्गिक आपत्ती येवो वा अपघात होवो,तेथे एकनाथ शिंदे हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,

 मदतीचा हात देण्यास प्रगट झालेच समजा! ही सर्व तळमळ पाहिल्यावर तर,त्यांना मसिहा म्हणायला पाहिजे.महत्वाचे म्हणजे येत्या २३ जानेवारी २०२३ पासून दरवर्षी  वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये शासकीय इतमामात साजरी करण्यासंदर्भात शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा राज्यात सर्वत्र स्वागत होऊन नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहे.इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंती दिनी विधिमंडळ सभागृहात  वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होताहे,याचा समस्त मराठी भूमिपुत्रांना सार्थ अभिमान आहे.


आत्ताचे मुख्यमंत्री तर,पूर्वाश्रमीचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार अन् कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे कोरोना काळात राज्यात १०० हून अधिक अद्ययावत रुग्णवाहिकांचे  वितरण करण्यात आले.

त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठी सोय होऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं सुकर झालं.सर्वात महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद पडले होते,ते शिंदे सरकारच्या काळात पुनश्च कार्यरत होऊन गेल्या ६ महिन्यांत २६०० लाभार्थ्यांचे महागडे ऑपरेशन्स होऊन त्यांना १९ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले,याचं श्रेय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना जाते.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या *राजकारणातून समाजकारण करण्याच्या शिकवणीमुळे ना.एकनाथजी संभाजीराव शिंदे हे आज सर्वसामान्य जनांचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात ओळखले जाताहेत.इतकेच नव्हे तर,अनाथांचे नाथ एकनाथ,लोकनाथ,

रुग्णदुत अशा विविध कौतुकास्पद  नावांनी शिंदेसाहेबांना जनमानसात संबोधिले जाते.शिवसैनिक असावा तर तो आनंद दिघे अन् एकनाथ शिंदे यांच्यासारखा,असे शिवसेनाप्रमुख

म्हणत असत.वास्तविक पहाता,हीच खरी निष्ठावान शिवसैनिक होण्याची फलश्रुती आहे. 


बाळासाहेबांचे पत्रकारांशी नेहमी स्नेहाचे व खेळीमेळीचे संबंध राहिले.ते कधी कधी पत्रकारांना रागवायचे.पण मनात दुरावा न ठेवता,लगेच त्यांना बोलवून त्यांच्याशी हसत खेळत,विनोद करत जवळकी साधायचे.पत्रकार असो वा शिवसैनिक यांना बाळासाहेब जर एखाद्या कारणासाठी रागावले,तर त्यास ते आशिर्वाद समजून स्विकारायचे.बाळासाहेबांचे हृदय हे हिमालयासारखे विशाल होते,ज्यात सर्वजण सामावून जायचे.महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांना कोणाबद्दलही राग-लोभ नसायचा,मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो वा वृत्तपत्राचा प्रतिनिधी.सर्वच जण त्यांना आपलेसे मानायचे,तर सर्वांना बाळासाहेब देखील हवे - हवेसे वाटायचे.म्हणून ते आपल्यात नसूनही सर्वांच्या मुखात आज पण एकच वाक्य असते,एकच साहेब,बाळासाहेब!


वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऋणानुबंधातून मुंबईचा कायापालट होणार,ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईनगरी उभारण्यासाठी मेट्रोचे जाळे,रेल्वे स्टेशन्सचे आधुनिकीकरण,नवीन विमानतळांची उभारणी,रस्त्यांचे काँक्रीटीकरण,सांडपाणी व्यवस्थापन,अद्ययावत हॉस्पिटल्सची निर्मिती आदी तत्सम पायाभूत सुविधा उभारल्या जातील,जेणेकरून बाळासाहेबांचे आधुनिक व सुंदर मुंबईचे स्वप्न साकार होऊ शकेल.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अन् गृहमंत्री अमितजी शाह यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शिवसेना-बीजेपी युती सरकार हे मुंबईसह राज्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कटिबद्ध होणं म्हणजे हीच खरी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरेल.बोला तर...जय महाराष्ट्र!


जीव लावून वेड्यापरी सोडून गेलात जना...!

काहो,साहेब जन्म घ्या पुन्हा,वाट पहाते बाळासाहेबांची शिवसेना...!



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने