शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील भोरटेक येथील श्री. महाकाल पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
भोरटेक येथील श्री. महाकाल पिंपळेश्वर महादेव मंदिरात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. चार दिवशीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावात श्री. महाकाल पिंपळेश्वर महादेवाची पिंड, नंदी, कासव, घंटा यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सदर मिरवणुकीत ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान भोलेनाथांचे गाणे व जयघोषात सारा आसमंत दुमदुमला होता. महादेव मंदिराचा लोकवर्गणीतून भव्य दिव्य असे मंदिराचे बांधकाम करून प्राणप्रतिष्ठा सोहळा चार दिवस सुरू होता. चार दिवस रोज दिवस रात्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भजन, सुंदरकांड, व्याख्यानमाला, कीर्तन, गरबे आदी. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता ब्रम्हवृंदानच्या महापूजेने व मंत्रोपचाराने विधीवत पूजा होऊन महाआरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. भोरटेकसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्राणप्रतिष्ठा सोहळा संत श्री. प.पू. राजारामजी महाराज मेन्द्राना, संत श्री. प. पू. प्रवीण दासजी महाराज मेन्द्राना, आचार्य जोतिषाचार्य वेदमूर्ती भूषण थेटे गुरुजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ग्रामस्थांचे व पंचक्रोशीतील भाविकांचे अथक परिश्रम लाभले.
