CRPF जवान आणि IT कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


पुणे, – तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी (वय 25) या दाम्पत्याला मिळाला आहे.


यावेळी सीआरपीएफ जवान गोरक्षनाथ यांनी प्रतिक्रिया दिली की, मी सीआरपीएफ सैन्य दलात छत्तीसगड येथे कार्यरत असून सुट्टीनिमित्त गावी आलो होतो. आमचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एकादशी दिवशी आम्हाला महापूजेचा आणि पाहिले दर्शन घेण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य आहे. माझे वडील वारकरी आहेत. आई-वडिलांच्या पुण्याईने आम्हाला ही संधी मिळाली. सर्वांना सुखात ठेव असे मागणे माऊलींकडे मागितले.


एकादशीला महापूजेसाठी कशी होते भाविक दाम्पत्याची निवड?


एकादशीच्या दिवशी रात्री 12 ते पहाटे 2 यावेळेत 11 ब्रम्हवृन्दाच्या वेदघोषात माऊलींना महापूजा (पावमान अभिषेक व दुधारती) करण्यात येते. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, निमंत्रित उपस्थित असतात. यावेळी महापूजेसाठी एका भाविक दाम्पत्याची निवड करण्यात येते. दर्शनबारीत सर्वात पुढे जे दाम्पत्य असेल त्यांना हा पूजेचा मान मिळतो. गेल्या वर्षी जालना जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला हा मान मिळाला होता. यावर्षी चौधरी दाम्पत्याला हा मान मिळाला. लाखो भाविकांमधून एका दाम्पत्याची निवड होत असते त्यामुळे भाविक हा मान मिळणे भाग्याचे समजतात.


दरम्यान, रविवार (दि. 20) कार्तिकी एकादशी आहे तर मंगळवार (दि. 22) माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा आहे. 3 लाखापेक्षा अधिक भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने