शिरपूर: तालुक्यातील ग्रामीण भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी कक्ष सुळे भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सुळे, रोहिणी, आंबे, सांगवी परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दररोज दिवसभर विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत.
रब्बी हंगाम सुरू आहे; शेतकरी बोरवेल, विहीरतून पिकांना पाणी देत आहे. विजेच्या लपंडावामुळे पाण्याच्या मोटारी जळून जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज वेळेवर मिळत नाही मात्र वीज बील वापरापेक्षा जास्त येते अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
सदर भागात गावठाणची वीज १८ तास व शेती करिता ८ तास वीज सोडली जाते परंतु वारंवार खंडित हाेत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा काहीही कामासाठी खंडित केला जाताे. तर अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त आहेत, काही ठिकाणी बंद आहेत, तारा लोंबकलेल्या आहेत, झाडाच्या फांद्या तारामध्ये येत असल्याने वीजपुरवठा खंडित हाेत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
%20(1).jpeg)