शहादा तालुक्यातील कलमाडी येथील जिजाबाई जगन्नाथ राहुर ही महिला पैसे काढण्यासाठी शहादा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत आली होती. या बँकेतील खात्यातून महिलेने १६ हजार रुपये काढले या रुपयांची असलेली रोकड एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून बँकेतील काउंटरवरच पैशांची स्लिप भरत होती. यावेळी संधी साधू चोरट्याने प्लास्टिकच्या पिशवीला ब्लेडने कापून १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. काही वेळानंतर या महिलेला पिशवी हलकी लागू लागल्याने पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. बँकेतून कामासाठी काढलेले पैसे चोरीस गेल्याने जिजाबाई राहुरी या महिलेला बँकेतच रडू कोसळले. यावेळी बँकेचे अधिकाऱ्यांनी
लागलीच सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे बँकेत आलेल्या महिलेकडील रोकड चोरट्याने चक्क काउंटरजवळून चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहादा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमुळे वाढ झाली आहे. दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. घरफोड्यांसह वाहने चोरीला जात असून नागरिकांकडील दागदागिने व रोकड देखील लांबण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहादा पोलिसांचे चोरट्यांवर वचक दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच शहादा शहरात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी करून चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजसह सर्विस रिव्हाल्वर देखील लांबविली होती. या चोरीच्या घटनेतील चोरट्यांचा शोध घेण्यास शहादा पोलीस अपयशी ठरत असल्याने एकही गुन्ह्यांची अद्यापपर्यंत उकल झालेली नाही. त्यामुळे शहादा पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना थांबविण्यासाठी शहादा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
%20(28).jpeg)