मुंबई (रवींद्र मालुसरे ) : तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखक, किल्ले अभ्यासक, शिवइतिहास, नाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धे, सुधीर जोगळेकर, माधव जोशी, प्रसाद भिडे, विनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाही; परंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतो, ज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरी, दुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
