मित्रत्वाचे धन - स्वर्गीय चंदन आबा आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन.... संपादकीय - महेंद्रसिंह राजपूत



दीपावली हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद उत्साह आणि दीपोत्सवाचा व अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक महत्त्वपूर्ण सण असतो. यातील एक महत्त्वाचे पर्व म्हणजे धनतेरस. पण यापुढील आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक दीपावलीच्या धनतेरस हा सन आमच्या प्रत्येक मित्रासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अविस्मरणीय असाच असेल. कारण मागील वर्षी दीपावलीच्या काळात धनतेरस च्या दिवशी  आम्ही सर्व मित्रांनी मित्र रुपी अनमोल धन स्वर्गीय चंदन आबांच्या रूपाने गमावले आहे. आबांच्या जाण्यास एक वर्ष झाला असला तरी आबांची पोकळी आमच्या सर्व मित्रांच्या जीवनात आयुष्यभर असेल आणि ती भरून निघणे कदापि शक्य देखील नाही. 


मागील वर्षी धनतेरसच्या दिवशी आमच्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि जिवलग मित्र स्वर्गीय चंदन सिंग राजपूत यांनी अल्पशा आजाराने जगाच्या अखेरचा निरोप घेतला. आबा आपण आम्हा सर्वांना सोडून निघून तर गेलात पण हे मान्य करायला आमचे मन आजही नकार देते. आजही आम्हास वाटते की आम्ही केबल वर बसले आहोत आणि कुठून तरी चंदन आबा येतील आमच्या जवळ बसतील आणि म्हणतील चल रे बस झाले तुझे आता खूप माज आला तुला  चल आज सर्वांना चहा पाजून टाक. आबांच्या शब्द खाली पडत नाही तोवर मित्रांसाठी चहा आलेला असायचा. चहा म्हणजे आबांसाठी जीव की प्राण, पण आता काय सांगावे आबा तुमच्या विना केबलच्या चहाला गोडीच राहिली नाही.


स्वर्गीय चंदन आबा यांनी प्रत्येक मित्राच्या मनात आणि हृदयात असे काही घर केले आहे की आपल्या आठवणी आणि आपल्या स्मृती या आम्हास पावलो पावली जाणवतात.

स्वर्गीय चंदन आबा हे फक्त मित्रांसाठी नव्हे तर आपल्या ओळखीतल्या प्रत्येक माणसासाठी जीव की प्राण असणारा माणूस. आबांच्या स्वभावगुण इतका मोठा होता की अनोळखी माणूस देखील त्यांना जीवास जीव द्यायला तयार व्हायचा. स्वर्गीय चंदन आबाच्या रूपाने शिरपूर तालुक्यात लाभलेले एक विशाल मनाचे राजकीय नेतृत्व हरपले त्यांच्या जाण्याने फक्त मित्रच नव्हे तर संपूर्ण समाज आणि राजकीय विश्व देखील पोरके झाले. राजकारणातून समाजसेवा कशी करावी आणि जनसामान्यांच्या मनात आपले स्थान कसे निर्माण करावे याचे स्वर्गीय चंदन आबा आहे एक ज्वलंत उदाहरण होते. अगदी तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापासून तर अगदी उच्च स्तरावरील व्यक्तीपर्यंत आपणाकडून होईल ती मदत करण्याच्या मनस्वी प्रयत्न ते नेहमीच करत असत. त्यांच्या हातून जेव्हा एखाद्या गोरगरिबाचे न  होणारे काम व्हायचे अथवा त्यास वैद्यकीय मदत व्हायची तेव्हा चंदन आबा यांना मनापासून आनंद व्हायचा. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद शोधणारा आणि रस्त्यावर कार्यालयात टाकून जनसेवेचा ध्यास ठेवणारा असा सच्चा जनसेवक शिरपूर तालुक्यात पुन्हा होणे नाही. राजकारण करत असताना कोणत्याही राजकीय विरोधकाला आबांनी कधीही शत्रुत्वाच्या नजरेने पाहिले नाही तर हसत खेळत आपला प्रतिस्पर्धी म्हणून संवाद साधला आणि राजकारण केले. राजकारणात खालच्या स्तरावर जाऊन टीकाटिप्पणी करणे अथवा द्वेष करणे हा भाव त्यांच्या मनी कधी येत नसे. आणि निवडणूक संपली की विरोधक देखील आबाच्या कट्ट्यावर येऊन बसतात आणि चहाच्या आस्वाद घेतात इतके शुद्ध आणि पवित्र राजकारण या तालुक्यात चंदन आबांनी केले.
आज जेव्हा तालुक्यात नगरपालिका इलेक्शन ची रणधुमाळी सुरू होत आहे. तेव्हा राजकारण्यांना तर सोडा सामान्य मतदारास देखील मनापासून असे वाटते आबानी पुन्हा एकदा यावे राजकारणाच्या आखाड्यात उतरावे, आणि मतदारांनी आबाच्या पारड्यात भरभरून मते देऊन हक्काच्या माणसास एक सच्चा जनसेवकास निवडून द्यावे.

पण हे सर्व आता प्रत्येकासाठी फक्त स्वप्न राहिले असून उरले आहेत त्या फक्त स्वरणीम आठवणी. आणि आबा करून गेलेले काम आणि त्यांच्या मनात असलेले जनसेवेची अपूर्ण स्वप्न हेच फक्त आता शिल्लक राहिले आहे.

आज वर्षभरानंतर पुन्हा तो दिवस आल्याने आबा आमच्या सर्वांचे मन आपल्या आठवणीने भारावून गेले आहे. आबा आपले अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची ताकद परमेश्वर आम्हा सर्व मित्रांना देवो आणि आपल्या मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो हीच आम्हा सर्व मित्रांची तुम्हास श्रद्धांजली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने