*लेख : दिपावली* *दिपावली: ज्ञानाच्या प्रकाशातून, अज्ञानाच्या अंधाराचे दहन* -✍️पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे*




दिपावली म्हणजे स्नेहाच्या - प्रेमाच्या प्रकाशाची उधळण होय.दिवाळी-दीपोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा-प्रकाशाचा सण आहे.वास्तवात हा उत्सव समृद्धी देणारा सण आहे.वर्ष भरातल्या चिंता,भय,ताणतणाव,
महामारी यांची मरगळ झटकून टाकत नव्या उमेदीने जीवनाला सुखमय- आनंदमय करणारा हा सण आहे.अज्ञानाचा अंधार नाहीसा करून मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश फैलवणारा हा सण आहे.




सोन पावलांनी येणाऱ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आध्यात्मिक-सांस्कृतिक महत्व आहे.धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत प्रत्येक 
क्षण न क्षण हर्षोल्हासात साजरा केला जातो.तथापि दीपावलीचा शुभारंभ हा खऱ्या अर्थाने *वसुबारस* ने(२१ ऑक्टोबर) होत असून,सायंकाळी गाय- वासरूची पूजा करून त्यांना नैवद्य खाऊ घातले जाते. 
त्यानंतर *धनत्रयोदशी* ला(२२ ऑक्टोबर) मुहूर्तानुसार देवापुढे धन,धान्य व धने ठेऊन त्याची पूजा करतात.अन् सायंकाळी दक्षिण दिशेला कणकेचे दिवे लावून त्यांची पूजा केली जाते.

*नरक चतुर्दशी* च्या दिवशी(२४ ऑक्टोबर) घरातील सर्व लहान मोठे सदस्य पहाटे अभ्यंगस्नान करतात.अन् त्यानंतर अंगणात फटाके फोडतात.आख्यायिकेत ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता.महत्वाचे म्हणजे ह्याच दिवशी (२४ ऑक्टोबर ) *लक्ष्मीपूजन* देखील असून,वद्य अमावस्येला सायंकाळी लक्ष्मी-कुबेरचे पूजन केलं जातं.धन-धान्य समृद्धी व सौख्य नांदावे,हे त्याचं प्रतिक असतं.

त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच *बलिप्रतिपदा* (२६ ऑक्टोबर) ज्यास आपण *दिपावली पाडवा* असेही म्हणतो.हा दिवस *साडे तीन मुहूर्तापैकी एक* असून,ह्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते.या शुभ दिनी पत्नी ही पतीला ओवाळून त्यांच्यासाठी दीर्घायुष्य चिंतिते.तर तिला याप्रसंगी तिच्या आवडीची साडीचोळी भेट म्हणून दिली जाते.योगा-योगाने या वर्षी ह्याच दिवशी 
*भाऊबीज* देखील असून,बहीण आपल्या 
भाऊरायाला ओवाळून पेढा भरवते अन् त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला प्रार्थना करते.भाऊ पण  बहिणीला तिच्या आवडीची भेटवस्तू देतो.दागदागिन्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते.वास्तवात हा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच!


दीपावलीच्या चार-पाच दिवसांच्या काळात घरोघरी रोषणाई केली जाते.तसेच घरांच्या ओट्यावर-गॅलरीत मातीच्या पणत्या लावून सभोवतालचा परिसर प्रकाशमय केला जातो.वास्तवात हा दिव्यांचा- रोषणाईचा सण आहे.आपल्या आया-भगिनी अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधित असतात.रंगबिरंगी आकाश कंदिलांची उभारणी,नातेवाईक - मित्रमंडळीला फराळाची मेजवानी अन् फटाक्यांची आतिषबाजीमुळे तर सारा परिसर दुमदुमुन जातो.प्रत्येक जण पारंपरिक वेशभूषा करून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो.चमचमीत फराळावर ताव मारून दिवाळीचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते.याशिवाय नातेवाईकांना-आप्तमित्रांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांना तर पारावारच उरत नाही.ग्रीटिंग कार्ड देऊन वा मोबाईलद्वारे मेसेज पाठवूनही दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जातात.येनकेनप्रकारे आपल्या मित्रांना,सगेसाईंना आपल्या दिपावली शुभेच्छा पोहोचविण्याचा हा सर्वंकष प्रयत्न असतो,हे दृष्टोत्पत्तीस येते. 

काळ कितीही बदलो,पण *आगरी-कोळी* समाजाची दिवाळी पारंपरिक पद्धतीने मोठ्या धूमधडाक्यात दरवर्षी साजरी होत असते.त्यांचं आपल्या पारंपरिक संस्कृतीशी घट्ट नातं आहे.मुंबई,ठाणे,कोकणातील भूमिपुत्रांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत काही आगळीवेगळीच असते.बलिप्रतिपदेला हे लोक पारंपरिक पद्धतीने बैलांची मनोभावे पूजा करत असतात.आपल्या शेतीत भरपूर उत्पन्न निघो,
धनधान्याची भरभराट होवो,या पार्श्वभूमीवर आगरी-कोळी लोक *इडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो* असे देवाला साकडे घालत भाताच्या पेंढ्या आपापल्या घरासमोर जाळत असतात.तसेच लक्ष्मी पुजनच्या दिवशी हे लोक रात्रीच्या वेळी तांदळाच्या पीठाची बैलाची प्रतिकृती तयार करून गावभर मिरवतात.अशा भव्यदिव्य पद्धतीने आगरी कोळी समाज आपली दिवाळी साजरी करत असतात.त्यांना आमच्यातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिपावली हा पारंपरिक भारतीय सण मतभेद-मनभेद विसरून तुम्ही आम्ही सर्वजण आपली हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती,परंपरा अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.खरं तर,दिपावली हा सण आता धर्ममर्यादा ओलांडून त्याने एक राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त केलं आहे,ही अभिमानाची गोष्ट आहे.यातूनच खऱ्या अर्थाने *धार्मिक सहिष्णुता* प्रस्थापित होऊन *सर्वधर्मसमभाव* निर्माण होण्यास चालना मिळते.समस्त युवक-युवतींचे भवितव्य उज्ज्वल होवो,तर ज्येष्ठांना निरोगी स्वास्थ्य लाभो,ह्याच दिपावलीनिमित्त अनंत शुभेच्छा! मित्रहो आपणा सर्वांना यंदाची दिपावली सुखा-समाधानाची,आनंदाची व भरभराटीची जावो,ही ईश्वर चरणी🚩प्रार्थना!💐🙏

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने