लम्पी स्किन या जनावरांमधील रोगाचा फैलाव वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १७ जिल्हे आणि ५९ तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळून आलेली आहेत.
यामुळे लम्पी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यभर जनावरांची वाहतूक, ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याचे प्रधान सचिव जगदिश गुप्ता यांनी काढले आहे.
सचिव गुप्ता यांच्या आदेशात, संपूर्ण राज्य हे लम्पी नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे राज्यात एका भागातून दुसऱ्या भागात जनावरे ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच लम्पीग्रस्त जनावर किंवा मृत जनावर यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत आणि अन्य साहित्य, प्राण्याचे शव , कातडी, जनावरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यावर ही बंदी घालण्यात आली आहे.