लेख- १५ सप्टेंबर : अभियंता दिन* *अभियंतांचे आधारस्तंभ - सर एम.विश्वेश्वरय्या* पत्रकार-रणवीर राजपूत,ठाणे* *गव्हर्नमेंट मीडिया,महाराष्ट्र शासन,मंत्रालय*



अभियांत्रिकी क्षेत्रात रोल मॉडेल ठरलेले विश्वविख्यात अभियंता भारतरत्न सर एम.विश्वश्वरेय्या यांचा १५ सप्टेंबर हा जयंती दिवस केंद्र सरकारद्वारे साऱ्या देशात *अभियंता दिन* म्हणून साजरा केला जातो,म्हणजे हीच त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या महान योगदानाची खरी पावती होय.

विश्वश्वरेय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील मुद्देनहल्ली या छोट्याश्या गावात झाला अन् जणू अभियांत्रिकी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा महान अभियंताच उदयास आला.त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री अन् आईचे वेंकटलक्षम्मा.त्यांचे वडील विद्वान संस्कृत पंडित होते.इंजिनिअरिंग शिक्षणासाठी काही काळ त्यांचे पुणे-मुंबई येथे वास्तव्य होते.मुंबई विद्यापीठात त्यांनी एल.सी.ई.पदवी संपादन केली.विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर संस्थानात काही वर्षे *दिवान* पद भूषविले.अभियांत्रिकी विषयावर आधारित कन्सट्रकटिंग इंडिया आणि प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया हे दोन ग्रंथ लिहिले,जे नवोदित अभियंत्यांना हमखास पथदर्शक ठरतील,हे निश्चित.

इंजिनियरिंगची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केल्याबद्दल विश्वेश्वरय्या यांची गुणवत्तेच्या  निकषावर तत्कालिन मुंबई सरकारने त्यांची कुठलीही परीक्षा न घेता,थेट सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदी नियुक्ती केली,हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं गमकच म्हणावं.त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा वेग सातत्याने वाढतच गेला.सन १८९५ ते १९०५ या दशकात त्यांनी देशातील महत्वाच्या प्रकल्प उभारणीत भरीव योगदान दिलं.मध्य प्रदेशातील दिग्रा ड्याम; कर्नाटकचा कृष्णराज 
सागर धरण;हैद्राबाद येथील पूरसंरक्षक योजना;मुंबईची ब्लॉक सिस्टीम एरिगेशन; बिहार येथील रेल्वे ब्रीज;ओरिसातील पाणी पुरवठा योजना हे प्रमुख प्रकल्प विश्वेश्वरय्या यांच्या नावलौकिकचे मानबिंदू ठरले.सर्वात मोठी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे म्हैसुरचा *केआरएस* हा आशिया खंडातला सर्वात मोठा ब्रीज गणला गेला,जो विश्वेश्वरय्या यांच्या बुद्धिमत्तेचा सर्वोच्च मानबिंदू ठरला.सृष्टीसौंदर्यानं नटलेलं मनमोहक असं *वृंदावन गार्डन* हेदेखील आशियातील सर्वोत्कृष्ट उद्यान म्हटलं जातं.ही पण त्यांचीच निर्मिती आहे.

सन १९०७ मध्ये सरकारी नोकरीतून 
सेवानिवृत्ती स्वीकारल्यावर  हैद्राबादच्या निजाम सरकारने त्यांची विशेष सल्लागार पदी नियुक्ती केली.विश्वेश्वरय्या यांनी हैद्राबादमधील दोन नद्यांवर धरणे बांधून हैद्राबाद शहर 
पूरमुक्त केलं.त्याचप्रमाणे म्हैसूरच्या राजाने देखील त्यांची मुख्य अभियंता पदावर नियुक्ती केली.तेथेही त्यांनी कृष्णराज सागर धरण अन् वृंदावन गार्डन उभारले.पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा पुरेपूर वापर करता यावा,या उद्देशाने उभारलेल्या *ब्लॉक सिस्टीम* चे ते जनकही म्हटले गेले.तत्कालिन मुंबई  सरकारमध्ये अभियंता असताना त्यांनी *खडकवासला धरण* साठी अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिती केली.अशा गेटची उभारणी भारतात प्रथमच झाली होती.त्याचे मानकरी
विश्वेश्वरय्या हेच होते. या अभूतपूर्व संशोधनाचे नाव पुढे 
*विश्वेश्वरय्या गेट* असे पडले.अंधश्रद्धा,मूर्तिपूजा यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते मानवात देवाचं वास्तव्य आहे.मानव सेवा हीच ईश्वर सेवा,असे त्यांचे ठाम मत होते.थोडक्यात त्यांचा शब्द सर्वच क्षेत्रात प्रमाण मानला जायचा.ते जसे बोलायचे,तशीच त्यांची कृती असायची.तात्पर्य,ते शब्दाचे पक्के होते.विश्वेश्वरय्या हे भारतातील पहिले सिव्हिल इंजिनियर म्हणून गणले गेले.अशा थोर अभियंत्याचे १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०१ वर्षी दुःखद निधन झाले.भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.ते जरी आज आपल्यात नसले,तरी राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट करण्याचा विक्रम त्यांनी केला,याबद्दल त्यांना प्रगत भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून आजही त्यांची जनमानसात ओळख टिकून आहे.त्यांच्या स्मरणार्थ देशात विविध ठिकाणी अभियांत्रिकी संस्था, विद्यालये अन् महाविद्यालये 
कार्यरत असणे,म्हणजे हीच त्यांना खरी मानवंदना आहे.

महत्वाचे म्हणजे विश्वेश्वरय्या हे जगातले असे एकच अभियंता आहेत,जे इंजिनिअरिंग,ऊर्जा,कृषी,
उद्योग,एरिगेशन,शिक्षण,
पूररोधक व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांचे शिल्पकार ठरले.या पार्श्वभूमीवर त्यांना १९९५ साली *भारतरत्न* हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अत: सर एम. विश्वेश्वरय्या यांना मराठी माणसाचा
त्रिवार मानाचा मुजरा!

सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या प्रगत धोरणानुसार कुठल्याही देशाची सांप्रदायिक पार्श्वभूमी न पहाता,तेथील विकसित तंत्रज्ञान-धोरणाचा अंगिकार करून आपल्या देशाचा विकास साधावा.देशाचा विकास हाच केंद्रबिंदू मानून आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचा पथदर्शक संदेश त्यांनी तमाम भारतीय अभियंतांना दिला आहे.अत: विश्वेश्वरय्या यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत 
ध्येयधोरणांना आत्मसात करून,त्यांच्या पावलावर पाऊल टाकत बांधकाम,ऊर्जा,
जलसिंचन,विज्ञान,माहिती तंत्रज्ञान,उद्योग आदी तत्सम क्षेत्रांत तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवोदित अभियंत्यांनी पुढील वाटचाल करून देशाचा शाश्वत विकास साधावा.राज्या-राज्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी,पुरेशी वीज,प्रशस्त रस्ते,दौलदार घरकुलं उपलब्ध होण्यासाठी अभियंत्यांनी प्रयत्नाची शिकस्त करावी,म्हणजे हीच खरी महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वश्वरेय्या यांना आदरांजली ठरेल.राज्यासह देशातल्या तमाम अभियंत्यांना अभियंता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा अन् पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने