पुणे:कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या 16व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी (बापू )पाटील यांनी शंकरावजी पाटील भाऊ यांच्या कार्याचा गौरव करताना कर्मयोगी शंकररावजी पाटील हे तत्त्वनिष्ठ, संस्कारक्षम व स्वतःची विचारधारा जतन करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते .
सुरुवातीला भाऊंच्या समाधी स्थळाचे मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर सभामंडपामध्ये भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाधी स्थळावर नारायणदास रामदास विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले .किर्तन केसरी ह .भ. प .अक्रूर महाराज साखरे यांचे यावेळी कीर्तन झाले.
शहाजी (बापू) पाटील म्हणाले की,'शंकररावजी पाटील (भाऊ) सहकार मंत्री असताना साखरेचे धोरण ठरवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे .मंत्री असताना देखील शासनाचा एकही रुपया आपल्या स्वतःसाठी खर्च न करणारे भाऊ हे ऋषिकुल्य व्यक्तिमत्व होते. शहाजी बापू पाटील यांनी यावेळी भाऊ तसेच पाटील कुटुंबाशी आपला जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे अनेक आठवणी सांगितल्या. स्वतःचा संघर्ष देखील त्यांनी यावेळी सांगितला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्तृत्व मोठे असून तालुक्याचा विकासासाठी एकजुटीने आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही यावेळी शहाजीबापू पाटील यांनी केले. शहाजी बापूंनी तो प्रसिद्ध डायलॉग सांगताच उपस्थित व्यक्तींनी त्यांना प्रचंड दाद दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' शारीरिक दृष्ट्या भाऊ आपल्यामध्ये दिसत नसतील पण भाऊंनी आपल्या 83 वर्षाच्या कारकिर्दीत जे कार्य केले ,जो समाज उभा केला, जे कार्यकर्ते उभे केले ,तालुक्यात ज्या संस्था उभ्या केल्या , घराघरांमध्ये जो विश्वास निर्माण केला ते कार्य आपल्या सर्वांच्या आयुष्यभर पिढ्यान पिढ्या स्मरणात राहील असे मोठे कार्य भाऊंचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी मानले.