धुळे: स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्वधर्म परिषदेत अखंड मानव समाजाच्या कल्याणासाठी "विश्वबंधूत्वाची" संकल्पना मांडून जगाला भारतीय संस्कृतीच्या वैश्विकतेचा परिचय करुन दिला असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रविणसिंग गिरासे यांनी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे केले.
शहरातील श्री शि वि प्र संस्थेचे साहित्य व वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे करियर कट्टा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत विश्वबंधुत्व दिनानिमित्त "स्वामी विवेकानंद विचारधारा आणि आजचा युवक" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक व स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक डॉ. प्रविणसिंग गिरासे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले त्याळेस मार्गदर्शन करतांना डॉ. गिरासे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शशिकांत बोरसे, डॉ. महेंद्र वाढे, डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. आनंद पवार, आयोजक डॉ. संभाजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार बाबासो. श्री कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने" या विषयावरील पुस्तके मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. कार्यशाळेत 256 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ. गिरासे पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरु भारताची संकल्पना मांडली. परधर्म सहिष्णुता हा संदेश शिकागो सर्वधर्मपरिषदेत मांडून सर्व मतांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या विचारातून देशभर प्रखर राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण झाल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीस गती प्राप्त झाली. आपल्या देशातील शिक्षण, सामाजिक, संस्कृतिक, धार्मिक, विज्ञानातील मूलभूत संशोधन, उद्योग, कृषी, आर्थिक विकास यासर्वच क्षेत्रात स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रीय विचारांचा प्रभाव दिसतो. स्वामीजींच्या संदेशातील शिक्षण, संस्कृती आणि विकास या मनुष्य निर्माण व राष्ट्रपुनरुत्थान कार्यासाठी लागणाऱ्या आदर्श नागरिक निर्मितीसाठी महाविद्यालयीन शिक्षणा बरोबरच स्वामी विवेकानंदांचे क्रांतिकारी विचार व प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या त्याग व समर्पणाच्या कार्याचे प्रबोधन प्रयत्नपूर्वक होणे गरजेचे आहे. राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर, त्याग व सेवा या मुल्यांनी समृद्ध असा आदर्श युवा वर्ग निर्मितीसाठी मुल्य संस्कार आवश्यक आहेत. स्वामीजींनी युवकांना सांगितले आहे की 'स्थिर बुद्धीचे व्हा, सर्वांत महत्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. यातूनच आपल्या उज्वल भविष्याची पहाट उजाळणार आहे. तुमचे सद्विचार आणि तुमची सत्कमें तुमचे रक्षण करतील. स्वामीजींच्या मते ब्रम्हचर्य हा युवकांसमोरील आदर्श असावा. स्वामीजींच्या मते चारित्र्यवान, निस्वार्थ आणि मन, मस्तिष्क व मनगट प्रबळ असाणारा युवकच राष्ट्रीय कार्यात आपले सर्वोच्च योगदान देऊ शकतील म्हणून चारित्र्य व शरीर संवर्धन अग्रस्थानी असावे. चित्त एकाग्रता सर्व यशांची गुरुकिल्ली आहे. आपले जीवन घडविणारे "माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे व चांगले विचार आत्मसात करविणारे, बुध्दी विशाल करणारे आणि व्यक्तीस स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मनोहर पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःतील भीती दूर करून कठोर परिश्रम करावेत तसेच समाज व राष्ट्र विकासात आपले योगदान द्यावे. युवकांनी चारित्र्य संपन्न नागरिक होण्याचे आवाहन केले. प्रा. शशीकांत बोरसे म्हणाले की, युवकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ध्येय निश्चित करुन त्यानुसार कार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ संभाजी पाटील म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन युवकांनी स्वतःचे व्यक्तीमत्त्व विकसित करुन समाजासाठी कार्य करावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ यशवंत शितोळे , संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री कुणाल पाटील , उपाध्याय डॉ एस टी पाटील उपाध्याय श्री प्रफुल्लकुमार शितोळे ,प्रशासकीय अधिकारी श्री प्रमोद पाटील ,करियर कट्टा चे विभागीय अध्यक्ष डॉ सचिन नांद्रे ,जिल्हा समन्वयक डॉ सचिन गोवर्धने यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आली कार्यशाळेच्या यशस्वीते साठी नामदेव पारखे, जितेंद्र देवरे, कैलास जाधव, प्रवीण ठाकरे, रवींद्र पगारे, ज्ञानेश्वर खलाने, विशाल गोपाळ यांनी परिश्रम घेतलेत.या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ,आभार डॉ संभाजी पाटील यांनी मानले .