धुळे प्रतिनिधी
मे 2013 ला दोन लाख रुपये 120 टक्के व्याजाने घेतले होते. त्याबद्दल आतापर्यंत व्याजापोटी 23 लाख 20 हजार रुपये देवूनही पुन्हा पैशांचा तगादा लावणार्या धुळ्यातील तीन अवैध सावकारांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जमानागिरी रोड परिसरातील भावसार कॉलनीत राहणारे महेेेश माधव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीचे वडील माधव शंकर मोरे यांनी रवींद्र अर्जुन शिरसाठ व भिकूबाई अर्जून शिरसाठ या दोघांकडून मे 2013 मध्ये दोन लाख रुपये 120 टक्के व्याजदराने घेतले होते. त्यानंतर 2017 पर्यंत व्याज व मुद्दल रकमेपोटी 20 हजार रुपये व्याजावर व्याज या प्रमाणे दहा लाख 80 हजार रुपये व 2019 मध्ये चार लाखांचा धनादेश तसेच 3 डिसेंबर 2019 मध्ये आठ लाख 40 हजार रुपये किंमतीची शिंदखेडा तालुक्यातील सोंडले शिवारातील गट क्रमांक 89/1/ब ही शेती किरण मच्छींद्र जाधव रा. विखेनगर धुळे याच्या नावावर बळजबरीने करुन घेण्यास भाग पाडले.
आतापर्यंत रवींद्र शिरसाठ याला 23 लाख 20 हजार रुपये व्याजासह परत केले. मात्र ज्यांनी कर्ज घेतले ते माधव शंकर मोरे हे मयत झाले. त्यानंतर या सावकारांनी माधव मोरे यांच्या घरी येवून त्यांचा मुलगा महेश व कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांच्या फिर्यादीवरुन धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि 384, 420, 363, 504, 506, 34 व सावकारी कायदा 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एपीआय तिगोटे हे तपास करीत आहेत.
