धुळे । प्रतिनिधी
झोप येत असल्याने अभ्यास करण्यास दहा वर्षीय बालिकेने नकार दिल्यामुळे संतापलेल्या बापाने बालिकेच्या डोक्यात हातोडा टाकून गंभीर जखमी केल्याची घटना दोंडाईचा ता. शिंदखेडा येथील सिध्दार्थ नगरात घडली. या प्रकरणी त्या बालिकेच्या आईच्या तक्रारीवरुन बापाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात संगीता विनोद बागले (वय28, रा. सिध्दार्थ नगर दोंडाईचा) यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, त्यांची दहा वर्षाच्या मुलीने 30 जुन रोजी रात्री 9 वाजता तिच्या वडीलांना मी सकाळी लवकर उठून अभ्यास करेल, मला आता झोप येत आहे. मी आता झोपते असे सांगितले.
याचा विनोद सरदार बागले याला राग आला. त्याने संतापाच्या भरात त्या बालिकेला लोखंडी हातोड्याने मांडी, मान, पाठ आणि डोक्यावर मारहाण केली. यात ती बालिका गंभीर जखमी झाली. आईच्या फिर्यादीवरुन भादंवि 324 प्रमाणे विनोद बागले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ माळी हे करीत आहेत.
