धुळे जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून विशेष घटक योजनांविषयी होतेय जनजागृती



 
धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विशेष घटक योजनेच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे धुळे जिल्ह्यात जनजागृतीपर प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लोककला पथकांच्या माध्यमातून गावागावांमध्ये समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. 
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शासनाने गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या पथकांतर्फे ग्रामस्थांना देण्यात येत आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्या सहकार्याने ही प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात  श्री चिराई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अर्थे, ता. शिरपूर, महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्था, तऱ्हाडी, ता. शिरपूर, श्रमिक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे नटराज कलापथक, श्री सदगुरू सांस्कतिक कला बहुउद्देशीय संस्थेच्या पथकाने समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, कन्यादान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मॅट्रिकपूर्व शिक्षण फी, परीक्षा प्रदान योजना, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, रमाई आवास योजना, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व बौध्द जातीतील बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टर व औजारे योजना, अनुसूचित जमातीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती देण्यात येत आहे.
याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करून घेणे, नियमितपणे मास्कचा वापर, हात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने