पुणे: कर्मयोगी शंकररावजी पाटील तथा भाऊ यांची आज 98 वी जयंती असून या निमित्त इंदापूर महाविद्यालयात कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधीस्थळाचे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय भाऊंनी तालुक्याच्या सर्व क्षेत्राच्या उज्ज्वल यशासाठी वाहून घेतले. त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्यामुळे इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला आहे.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध प्रशालेमध्ये निबंध, ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला तसेच इतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले ,' स्वर्गीय भाऊंनी आपल्या आयुष्यात नैतिक अधिष्ठान निर्माण केले. भाऊंचे कार्य उत्तुंग आहे. दिल्लीच्या तख्तापर्यंत त्यांनी आपले कार्य कर्तुत्व सिद्ध केले. भाऊंनी तालुक्याच्या सर्व क्षेत्राच्या उज्वल यशासाठी वाहून घेतले. त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्यामुळे इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला. भाऊंचे विचार आणि जीवन पद्धती आदर्श असून त्या विचारधारेनुसार आपल्याला वाटचाल करावयाची आहे.
यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, पंडितराव पाटील, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक शेखर पाटील, बाळासाहेब मोरे, अंकुश पाडुळे, बापू जामदार, दत्तात्रय पांढरे, सागर गानबोटे, अविनाश कोथमिरे, दादा पिसे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, पोपट पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायणदास रामदास हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.
आभार अशोक भोईटे यांनी मानले
Tags
news
