नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके



शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यात अवकाळी पाऊस व गारामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनाम्याला सुरुवात झाली असुन एकही जण मदतीपासुन वंचित राहणार नाही. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्क्मपणे उभे असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करतांना  केले. आज रोजी शिंदखेडा तालुक्यातील गारपीटग्रस्त गावाची पाहणी करतांना श्री.साळुंके बोलत होते. यावेळी त्यांनी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी श्री.विनय बोरसे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, कृषी सहाय्यक श्री.पिंपळे, मंडळ अधिकारी शरद पाटील, युवासेनेचे अमोल राजपुत, वरपाडे गावाचे ॲड.वसंत पाटील, पी.एल.पाटील, श्री.दिपक पवार, श्री.नवनीत पवार, श्री.मनोहर पवार यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            काल शुक्रवार दि. 07 रोजी सायंकाळी शिंदखेडा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारा व अवकाळी पाऊस झाला. यामुळे शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना गारपीटीचा तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान वरपाडे, नेवाडे, अमळथे, विरदेल, चिलाणे, धमाणे, कुरुकवाडेसह शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना गारपीट व अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. परिसरात कपाशी, दादर, केळी, हरबरा, गहू, कांदे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीवर आलेली दादर, हरभरा, केळी, कापूस, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतातील व गावातील विद्युत पोल उन्मळून पडलेत. वरपाडे गावाला शेतात काम करणाऱ्या महिला गारपिटीमुळे जखमी झाल्यात. वरपाडे गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गावकऱ्यांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात अडचणी बोलून दाखविल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब विद्युत पुरवठा सुरु करणेबाबत सूचना श्री.साळुंके यांनी केल्या.
            यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत. वरपाडे गावाचे श्री.दिपक पवार व श्री.चंद्रकांत पवार यांचे प्रत्येकी 15 लाखापर्यंत नुकसान झाले. यावेळी लोकांच्या भावना ऐकुन घेतल्यानंतर श्री.साळुंके म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यातील व जिल्ह्यातील इतर गावांमध्ये जी गारपीट झाली याची कल्पना पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांना देण्यात आली असून मा.पालकमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना ताबडतोब पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

            तसेच संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांना शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. मा.कृषीमंत्री हे संवेदनशील मंत्री असून लवकरच शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देतील.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने