शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे घरांचे व पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी, आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन



शिरपूर : शिरपूर तालुक्यात काल दि. 7 जानेवारी रोजी आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे घरांचे व पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी साठी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, दि. 7 जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे घरांचे तसेच पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली दि. 8 जानेवारी रोजी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.

संपूर्ण तालुक्‍यात शनिवारी दि. 7 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 7 वाजेदरम्यान वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. यात सर्वच ठिकाणी शेती पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. तालुक्यात शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील फळपिके, कांदा, हरभरा, गहू, तसेच अनेक पिके, राहती घरे, पशुधन, रब्बी हंगामातील पिकांचे इ. चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे आमदार काशिराम पावरा यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.

यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, वाघाडी माजी सरपंच ऍड. प्रतापराव बाबा पाटील, शिक्षण मंडळ सदस्य राजेंद्र पाटील, जयवंत पाटील, शेतकरी यांनी निवेदन दिले.

तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेले बळीराजा पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाने गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर सातत्याने अवकृपा केली आहे. शेती करणे कोणत्याही परिस्थितीत आता परवडणारे राहिले नाही. कालच्या गारपिटीने झालेल्या नुकसानीचे, फळपिके व रब्बी हंगामातील पिकांचे महसूल विभाग, कृषी विभाग व विमा कंपनी यांनी संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावे व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन देण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने