जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठकीत विविध विषयांवर चर्चा




धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक आज सकाळी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
खासदार डॉ. सुभाष भामरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, खासदार डॉ. हीनाताई गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थित होते. 
खासदार डॉ. भामरे म्हणाले, धुळे जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. धुळे शहरातील भूमिगत गटार, अक्कलपाडा प्रकल्पावरून सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे. ‘मनरेगा’बाबत चर्चेसाठी लवकरच स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अशाही सूचना खासदार डॉ. भामरे यांनी दिल्या. 
वीज वितरण कंपनीसह राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉ. गावित, आमदार श्री. पावरा, आमदार श्रीमती गावित, धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, अशासकीय सदस्य वसंत पावरा, संजय जाधव, प्रा. अरविंद जाधव आदींनी भाग घेतला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 
सुलवाडे- जामफळ योजनेला गती द्यावी
तत्पूर्वी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेचा खासदार डॉ. भामरे यांनी आढावा घेतला. उपसा सिंचन योजना राष्ट्रीय योजना असून या योजनेला गती द्यावी. प्रलंबित कामे सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधत पूर्ण करावीत. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दरमहा आढावा बैठक घेवून अहवाल सादर करावा, असेही निर्देश खासदार डॉ. भामरे यांनी दिली. योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एस. पाटील यांनी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने