पुणे:| इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी व अंथूर्णे परिसरातील दोन घरांवर दरोडेखोरांनी दरोडा टाकत दीड लाख रुपये रोख रक्कम, साडे चौदा तोळे सोने व चांदीचा ऐवजावर डल्ला मारला आहे. टाकण्यात आलेल्या या दरोड्यात अज्ञात चोरट्यांनी कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना जबर मारहाण केली असून त्यांच्या कपाळाला सहा टाके पडले आहेत.घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि.27 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.सहा अज्ञात दरोडेखोरांनी रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडला. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्या आवाजाने गायकवाड यांच्या पत्नी सुनंदा यांना जाग आली.त्यानंतर या अज्ञात चोरट्यांनी सुनंदा गायकवाड यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत कपाटातील सर्व ऐवजाची मागणी केली. घाबरलेल्या सुनंदा गायकवाड यांनी कपाटातील रोख रक्कम दीड लाख, ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदी असा ऐवज दरोडेखोरांच्या ताब्यात दिला.
हा सर्व प्रकार घडत असताना राजेंद्र गायकवाड जाग आली. त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गायकवाड यांना काठीने मारहाण केली. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार देखील केला आहे.यामध्ये राजेंद्र गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.
त्यानंतर दरोडेखोर एवढ्यावरचं थांबले नाहीत तर गायकावड पती-पत्नीला घरात कोंडून घराच्या वरील मजल्यावर जाऊन चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.यास गायकवाड पती पत्नीने विरोध केला. या गोंधळाने घरातील वरच्या मजल्यावर झोपलेले राजेंद्र यांचे बंधू राहुल गायकवाड व त्यांची पत्नी वैशाली यांना जाग आली. त्यावेळी राहुल यांनी वरून चोरट्यांना स्टीलची बादली फेकून मारली.या गोंधळाने आजूबाजूचे लोक देखील जागे झाले. त्यानंतर चोरट्यांनी ताब्यात घेतलेला ऐवज घेऊन तेथून पळ काढला.
त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान अंथूर्णे हद्दीतील वाघवस्ती येथील मल्हारी वाघ यांच्या घराचा दरवाजा तोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख रकमेची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सदर गुन्ह्याचा तपास तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.
Tags
news
