पुणे:इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या शवविच्छेदन गृहाशेजारीच, शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले आहेत. ते अवशेष डुक्करे, कुत्रे आदी प्राणी खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने अधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा दिसून येत आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू झालेल्यांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. मयत व्यक्तीचे शरीराचे अवशेष काढून (विशिष्ट केमिकल) एन्झायमच्या मदतीने ते अवशेष प्लास्टिक बरणीत साठवणूक करून प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्याचा एक नमुना हा याच ठिकाणी साठवण्यात येतो. मात्र काही कालावधीनंतर सदरचे अवशेष हे एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करावयाचे असतात. मात्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाने असे न करता सदरचे अवशेष प्लास्टिक भरणीसह शवविच्छेदन गृहाशेजारीच उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात मांसाचे सर्व तुकडे जळाले गेलेले नाहीत, तर उघड्यावर पडलेल्या या अवशेषांना सध्या डुक्करे, भटकी कुत्री खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे
Tags
news
