धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता
दिनांकावर (Qualifying Date) आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी वेळापत्रक
निश्चित करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारण्यास
पाच डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिध्दीस
दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
छायाचित्र मतदार
यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मा. भारत
निवडणूक आयोगाने वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार 30
नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात
येणार होत्या. मात्र,
भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार दावे व हरकती स्वीकारण्यास पाच
डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
या मोहिमेमध्ये
दाखल करावयाचे दावे व हरकतींबाबत सविस्तर मार्गदर्शन असे : एक
जानेवारी 2022 रोजी ज्यांनी वयाची 18 वर्षे
पूर्ण केली आहेत, परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही,
अशा वंचित नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करणेकरीता
फॉर्म क्रमांक सहा भरावा. मतदार यादीतील नाव कमी करण्यासाठी
/ हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक सात भरावा. ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म
दिनांक व
पत्ता, नातेवाईकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, अशा मतदारांनी देखील दुरुस्तीचा फॉर्म क्रमांक आठ भरावा.
ऑनलाईन स्वरुपात
सादर करण्याची सुविधा Voter Helpline App वर उपलब्ध आहे. सदरचे ॲप Google Play Store वरुन डाऊनलोड केल्यास त्यावर
मतदार यादीतील नावांचा शोध घेणे, वरीलप्रमाणे नाव नोंदणी,
दुरुस्ती, नाव कमी करण्याची सुविधा, तसेच e Epic डाऊनलोड करणे, आपले
मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूक विषयक चालू घडामोडी,
निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध आहे. जागृत मतदार www.nvsp.in या संकेतस्थळावर सुध्दा मतदान नोंदणी विषयक वरील अर्ज
ऑनलाईन स्वरूपात करू शकतात. सदरचे संकेतस्थळावर मतदार नोंदणी
विषयक, e Epic डाऊनलोड करणे, मतदार यादीत
नावाचा शोध घेणे, मतदार यादी उपलब्धतेची सुविधा उपलब्ध आहे.
धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी Voter Helpline App डाऊनलोड करुन तसेच www.nvsp.in या संकेतस्थळावरील
उपलब्ध ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
श्री. शर्मा यांनी केले आहे.
