धुळे, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 45 हजार 74 शेतकऱ्यांना 342 कोटी 72 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शासनाने सत्ता स्थापनेनंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर करीत दिलासा दिला होता. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकित असलेली व परतफेड न झालेली दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम होती, अशा अल्प, अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. धुळे जिल्ह्यात पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी, धुळे यांच्या नेतृत्वाखाली सनियंत्रण समितीचे गठण करण्यात आले होते. राज्य शासन, योजनेचे मध्यवर्ती पथक, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात आली. धुळे जिल्ह्यात धुळेसह, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुका मिळून 49 हजार 801 कर्जखाती अपलोड करण्यात आली होती. आधार प्रमाणिकरण झालेल्या खात्यांची संख्या 45 हजार 602 एवढी होती. आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित खातेदारांना वेळोवेळी संधी देण्यात आली. तक्रार असलेल्या खात्यांची जिल्हास्तरीय समिती व तहसीलदारांच्या माध्यमातून निवारण करण्यात आले आहे. जिल्ह्यात अद्यापही 582 खातेदारांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 45 हजार 74 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. या शेतकऱ्यांना 342 कोटी 72 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या व एकूण रक्कम (अनुक्रमे तालुका, लाभ रक्कम वितरीत झालेली खाती (शेतकरी संख्या), एकूण रक्कम कोटींमध्ये) : धुळे- 16371, 119.22. साक्री- 11121, 87.38. शिरपूर- 6246, 51.14. शिंदखेडा- 11336, 84.98. अशी आहे
Tags
news


